अल्पसंख्यांक महिला बचत गटांना मिळणार कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:20+5:302021-06-25T04:07:20+5:30
नागपूर : राज्य शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक महिला बचत गटांना कर्ज वितरणाची योजना सुरू ...
नागपूर : राज्य शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक महिला बचत गटांना कर्ज वितरणाची योजना सुरू केली आहे. त्यानुसार नागपूरच्या हज हाऊस येथील मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अर्ज सादर करता येऊ शकतो.
महामंडळाचे अनिस कारगर म्हणाले, जिल्हानिहाय अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येच्या आधारावर निधीच्या वितरणाचा कोटा ठरविण्यात येणार आहे. सध्या अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थानिक कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वीही महिला बचत गटांनी अर्ज केले होते. यात नागपूर विभागातून अनेक महिला बचत गटांचा समावेश होता. परंतु योजना बंद पडल्यामुळे त्यांना लाभ मिळाला नव्हता. आता योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परंतु महामंडळाच्या नव्या अर्जदारांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. अल्पसंख्यांक महिला बचत गटांना योजनेत २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. त्यासाठी बचत गटांना सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.
............
शासनाच्या उदासीनतेमुळे महामंडळाची बिकट अवस्था
मौलाना आझाद महामंडळ मागील अनेक वर्षांपासून शासनाच्या उदासीनतेचा शिकार झाले आहे. राज्यात सत्ता परिवर्तनापूर्वी महामंडळात केवळ नियुक्त्या झाल्या. योजनांचे कार्यान्वयन झाले नाही. तर सत्ता परिवर्तनानंतरही महाविकास आघाडीने महामंडळाच्या योजनांबाबत काहीच पुढाकार घेतला नाही. दोन वर्षानंतर आता बचत गट कर्ज योजना अमलात आली आहे. परंतु टर्म कर्ज योजना अद्यापही ठप्प आहे. या योजनेची वाट अल्पसंख्यांक वर्गातील युवक सात वर्षांपासून पाहत आहेत. या योजनेमुळे त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी मदत होते.
...........