अल्पवयीन मुलांनी मुलीला पळवून आणले अन् वाहनचोरीत लावले
By योगेश पांडे | Updated: August 30, 2023 15:18 IST2023-08-30T15:18:04+5:302023-08-30T15:18:47+5:30
विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून जाताना पकडल्याने भंडाफोड

अल्पवयीन मुलांनी मुलीला पळवून आणले अन् वाहनचोरीत लावले
नागपूर : उपराजधानीत अल्पवयीन मुलांकडून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. एका प्रकरणात तर चक्क अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलीला पळवून आणले व तिला त्यांच्यासोबत वाहनचोरीच्या कामात लावले. पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकाने विना नंबरप्लेटच्या दुचाकीने जात असताना आरोपींना पकडल्यावर या प्रकाराचा खुलासा झाला. सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाला एका नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवर दोन मुले व एक मुलगी जाताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता ते पळाले. पोलिसांनी फिल्मीस्टाईल पाठलाग करून त्यांना ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले. ते सर्व अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यांच्याकडे दुचाकीची कागदपत्रे नव्हती. त्यांना दरडावून विचारले असता ते दिशाभूल करत होते. पोलीस ठाण्यात नेऊन दुचाकीबाबत तपासणी केली असता ती चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसी खाक्या दाखविल्यावर दोन्ही अल्पवयीन मुलांनी ती दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांनी एकूण पाच दुचाक्या चोरल्याचे सांगितले. तसेच संबंधित मुलीला ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळवून आणल्याचेदेखील सांगितले. पोलिसांनी मुलीला ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाला सोपविले व दोन्ही मुलांकडून १.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे, सचिन सावरकर, मौसमी कटरे, मनोज कालसर्पे, अनंता बुरडे, चंद्रकांत साळवे, बाळू गिरी, प्रफुल्ल लांबट, केवलराम, ओमप्रकाश मते यांच्या पथकाने ही कारवाई केली.