चमत्कारच... झाडामधून नळासारखी पाण्याची धार, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 13:22 IST2023-08-07T13:17:50+5:302023-08-07T13:22:49+5:30
या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहिले जात असून हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला हाेता

चमत्कारच... झाडामधून नळासारखी पाण्याची धार, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल
नागपूर : चंद्रपूरमध्ये ताडाेबा व्याघ्र प्रकल्पाच्या काेरसा रेंजमध्ये काही दिवसांपूर्वी एका चमत्कारीक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. या परिसरातील एका झाडाच्या खाेडामधून नळाप्रमाणे पाण्याची धार निघतानाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल हाेत आहे. केवळ धार निघत नसून लाेक ते पाणीही पिताना दिसत आहेत.
या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहिले जात असून हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला हाेता. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा चमत्कार नसून नैसर्गिक घटना आहे. नळासारखी धार निघण्यामागे दाेन कारणे असतात. प्राण्यांप्रमाणे झाडांमध्येही मुळापासून पानांपर्यंत पाणी पाेहोचविणाऱ्या जलवाहिन्या असतात. काही भागांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही असते. त्यातूनही पाणी निघण्याची शक्यता असते.
दुसरे कारण म्हणजे मानवाप्रमाणे झाडांनाही कीटकांद्वारे इनफेक्शन हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा झाडांना ट्यूमर हाेतो. कुऱ्हाडीने घाव घातल्यास ट्यूमरमधून पाणी बाहेर येते, जे तीन-चार दिवस तरी वाहू शकते. या पाण्यात बॅक्टेरिया व रासायनिक घटक राहण्याची शक्यता असते, ज्यामुळे आराेग्यासाठी घातक ठरू शकते. असे पाणी पिणे अपायकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण काहीही असाे पण ही घटना चमत्कारासारखी पाहिली जात आहे.