व्हीआयपी शहरात असताना कपिलनगरात गोळीबार; सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 10:22 AM2022-05-30T10:22:43+5:302022-05-30T10:26:42+5:30
ही घटना जुन्या वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर : विविध कार्यक्रमांसाठी राज्यातील व्हीआयपी नेते शहरात असताना कामगार नगर चौकात गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपींचा शोध सुरू आहे.
शेख शकील अहमद (३२) या व्यक्तीवर मोटारसायकलवर आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने गोळीबार केला. शकील जेवणानंतर पायी फिरायला गेला होता. तो घरी परतत असताना त्याच्याजवळ एक मोटारसायकल आली व मागे बसलेल्या व्यक्तीने गोळी चालविली. शकीलच्या मानेजवळ गोळी लागली. यानंतर दोघेही आरोपी फरार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजुबाजूचे लोक गोळा झाले.
पोलिसांना याची माहिती मिळताच कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख व निरीक्षक शुभांगी वानखेडे घटनास्थळी दाखल झाले. शकीलला तातडीने मेयो इस्पितळात नेण्यात आले. शकीलविरोधात आर्म्स ॲक्ट तसेच ‘क्रुएल्टी टू ॲनिमल्स’संदर्भात गुन्हे दाखल आहेत. ही घटना जुन्या वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे एक पथकदेखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरात नाकाबंदीदेखील केली व आरोपींचा शोध सुरू आहे.
रविवारी शहरात राज्यातील मोठे नेते उपस्थित होते. प्रत्यक्ष घटना घडली त्यावेळीदेखील शहरातील विविध भागात बंदोबस्त होता. तरीदेखील खुलेआम गोळीबार झाल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.