मेडिकलच्या भरवश्यावर खासगी लॅब मालामाल; रुग्णांची दिशाभूल करून खासगीमधून चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 03:46 PM2022-07-13T15:46:41+5:302022-07-13T15:52:41+5:30
रुग्णाचा रक्त नमुना घेताना एजंटला पकडले
नागपूर : मेडिकलमधील रुग्णांची दिशाभूल करून त्यांचे नमुने खासगी पॅथोलॉजी लॅबमधून तपासण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले. सोमवारी एका खासगी लॅबच्या एजंटला पकडून मेडिकल प्रशासनाने पोलिसांच्या हवाली केले. मेडिकलच्या भरवश्यावर खासगी लॅब गलेलठ्ठ होत असल्याचा हा प्रकार धक्कादायक असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे आवश्यक ठरते. मेडिकलमध्ये पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी व बायोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत. या तीनही लॅबमध्ये कोट्यवधी किमतीची अद्ययावत उपकरणे आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांसह पुरेसे मनुष्यबळ आहे. शासनाचा यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. असे असताना खासगी लॅबमध्ये गरीब रुग्णांचे नमुने पाठविले जात असल्याच्या तक्रारी होत्या.
अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘महाराष्ट्र सुरक्षा बल’ला (एमएसएफ) याची माहिती दिली. अनधिकृत लॅब टेक्निशियन, बोगस डॉक्टर, खासगी रुग्णालयाचे दलाल प्रतिबंधित करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी एक विशेष पथक रुग्णालयात गस्त घालत असताना वॉर्ड क्र. ६७ मध्ये एका रुग्णाचा रक्त नमुना घेताना पथकाला आढळून आले. विचारपूस केली असता तो धंतोली येथील एका खासगी लॅबमधून आल्याचे पुढे आले. सुरक्षारक्षकांनी त्याला अजनी पोलिसांच्या हवाली केले.
- यापूर्वीही तीन एजंटला पकडले होते
यापूर्वीही मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका महिला रुग्णाचे नमुने घेत असताना एका एजंटला तर, मेडिकलमधील बाह्यरुग्ण विभागात रुग्णाचे नमुने घेत असताना दोन खासगी लॅबच्या एजंटला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.