आत्महत्येसाठी पोलीस हेडक्वार्टरची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:08+5:302021-07-04T04:07:08+5:30

------ व्हीव्हीआयपीच्या जिवाचे रक्षण स्वत:च्या कुटुंबाला सोडले वाऱ्यावर आप्तांच्या आक्रोशाने हेलावले अनेकांचे मन नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

Misleading police headquarters for suicide | आत्महत्येसाठी पोलीस हेडक्वार्टरची दिशाभूल

आत्महत्येसाठी पोलीस हेडक्वार्टरची दिशाभूल

Next

------

व्हीव्हीआयपीच्या जिवाचे रक्षण

स्वत:च्या कुटुंबाला सोडले वाऱ्यावर

आप्तांच्या आक्रोशाने हेलावले अनेकांचे मन

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - विशेष सुरक्षा पथकात (एसपीयू) कार्यरत प्रमोद शंकरराव मेरगुवार (वय ४६) यांच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यासाठी पोलीस हेडक्वार्टरमध्ये खोटे प्रमाणपत्र सादर केले आणि त्याआधारे पिस्तूल मिळविल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एसपीयूमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते; कारण एसपीयूकडे व्हीआयपी, व्हीव्हीआयपीच्या जीविताच्या सुरक्षेची जबाबदारी असते. या युनिटमध्ये कार्यरत असणारा अधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सुरक्षा करतो. दुसऱ्याचा मृत्यू झेलणारा म्हणूनही एसपीजी, एसपीयूच्या जवानांकडे गर्वाने बघितले जाते. अशा या युनिटमध्ये पाच वर्षांपासून कार्यरत असलेले प्रमोद मानसिकरीत्या प्रचंड खचले होते. कोरोनाने शरीर खिळखिळे केल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसने घेरले होते. त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेल्यात जमा असतानाच दुसऱ्या डोळ्यानेही व्यवस्थित दिसत नव्हते. वारंवार शस्त्रक्रिया करूनही लाभ होत नसल्याने प्रमोद वैफल्यग्रस्त झाले. त्यांची मानसिक अवस्था बिघडल्यामुळे त्यांनी एक आठवड्यापूर्वी आत्महत्येचीच तयारी केली.

कोरोनाची लागण झाल्यामुळे १८ मार्चपासून ते आजारी रजेवर होते. त्याचवेळी त्यांनी आपले सर्र्व्हिस रिव्हॉल्व्हर पोलीस हेडक्वॉर्टरमध्ये जमा केले होते. २८ जूनला ते पोलीस मुख्यालयात पोहोचले. तेथे बनावट प्रमाणपत्र सादर करून त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. त्यांच्याकडून सर्र्व्हिस रिव्हॉल्व्हर मिळवून ते घरी आणले. एसपीयूच्या अधिकारी, कर्मचाऱ्याला एकाच वेळी ३० बुलेट (काडतूस) मिळतात. त्याच वापर त्यांनी स्वत:चा जीव घेण्यासाठी केला. प्रमोदच्या आत्महत्येचे वृत्त कळताच पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा यंत्रणांचे अधिकारीही त्याच्या घरी दाखल झाले. ते सुटीवर असताना त्यांच्याजवळ सर्र्व्हिस रिव्हॉल्व्हर आलेच कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आणि चाैकशीतून बनावट प्रमाणपत्राची धक्कादायक ही बाब उघड झाली. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.

विशेष म्हणजे, राज्य पोलीस दलात सुपरकॉप अशी ओळख असलेले एटीएसचे प्रमूख हिमांशू रॉय यांनी ११ मे २०१८ ला ब्लड कॅन्सरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी अशाच प्रकारे सर्र्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या जबड्यात गोळी झाडली होती. प्रमोदनेही आत्महत्येचा तोच आणि तसाच मार्ग निवडल्याने पोलीस दल हादरले आहे.

----

आधारस्तंभ गेला

अत्यंत सालस स्वभावाचे प्रमोद त्यांच्या आणि त्यांच्या भावाच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी दीपमाला (वय ३८), मुलगा वरुण (१७) आणि सायली (वय १२) नामक मुलगी आहे. भावाच्या कुटुंबात वहिनी आणि त्यांची दोन मुले आहेत. कुटुंबप्रमुख म्हणून प्रमोदच भूमिका वठवीत होते. त्यांना, पत्नी आणि दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर मात्र ब्लॅक फंगसने प्रमोद यांना घेरले आणि अखेर त्यांचा अशा पद्धतीने जीव गेला.

---

असे झालेच कसे ?

त्यांनी हे आत्मघाती पाऊल उचललेच कसे, असा प्रश्न घरच्यांनाच नव्हे तर सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनाही पडला आहे. व्हीआयपी, व्हीव्हीआयपीच्या जिवाचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणारा स्वत:च्या पत्नी मुलांना मात्र वाऱ्यावर सोडून कसा जाऊ शकतो, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रमोदच्या आत्मघातकीपणामुळे त्याची पत्नी आणि मुले निराधार झाली आहेत. त्यांचा आक्रोश अनेकांना नि:शब्द करणारा ठरला आहे.

---

Web Title: Misleading police headquarters for suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.