‘पेसो’ अधिकाऱ्याच्या घरातून आढळली गैरकारभाराची कागदपत्रे; ‘मिडलमॅन’ देशपांडेकडे सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने

By योगेश पांडे | Published: January 5, 2024 04:27 PM2024-01-05T16:27:30+5:302024-01-05T16:27:48+5:30

सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या घराची कसून तपासणी केली व एका अधिकाऱ्याच्या घरातून या प्रकरणासोबत इतर काही बाबींशी निगडीत गैरकारभाराची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mismanagement documents found in the house of 'Peso' officer | ‘पेसो’ अधिकाऱ्याच्या घरातून आढळली गैरकारभाराची कागदपत्रे; ‘मिडलमॅन’ देशपांडेकडे सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने

‘पेसो’ अधिकाऱ्याच्या घरातून आढळली गैरकारभाराची कागदपत्रे; ‘मिडलमॅन’ देशपांडेकडे सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने

योगेश पांडे 

नागपूर :
राजस्थानच्या एका केमिकल कंपनीला अतिरिक्त डेटोनेटर्स बनविण्याची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेणाऱ्या ‘पेसो’च्या (पेट्रोलियम ॲँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) दोन अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केल्यानंतर खळबळ उडाली आहे. सीबीआयकडून या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता सखोल तपास सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या घराची कसून तपासणी केली व एका अधिकाऱ्याच्या घरातून या प्रकरणासोबत इतर काही बाबींशी निगडीत गैरकारभाराची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील सुपर शिवशक्ती केमिकल्स प्रा.लि. या कंपनीचे संचालक देविसिंग कच्छवाह यांच्या कंपनीला मार्च २०२४ पर्यंत त्यांच्या डेटोनेटर्स उत्पादनाची क्षमता ७५ टक्क्यांपर्यंत वापरायची होती. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी ‘पेसो’चे उपमुख्य नियंत्रक अशोक दलेला व विवेक कुमार या दोन अधिकाऱ्यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. हा व्यवहार प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लेक व्ह्यू अपार्टमेंट, लक्ष्मीनगर) याच्या माध्यमातून होणार होता. सीबीआयच्या पथकाने लाच घेताना चारही आरोपींना रंगेहाथ पकडले व चौघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर सीबीआयच्या पथकाने देशपांडे व दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यालय व निवासस्थानाची झडती घेतली. एका अधिकाऱ्याच्या घरातून सीबीआयच्या पथकाला या व्यवहारात आरोपींचा गुन्हा उघडकीस आणणारी कागदपत्रे सापडली. तर देशपांडेच्या घरातून १.१९ कोटींचा मुद्देमाल सापडला. त्यात मोठ्या प्रमाणावर रोकड तर होतीच. शिवाय सोन्याची बिस्कीटे, चांदीचे दागिने व ‘पेसो’च्या कामकाजाशी निगडीत कागदपत्रेदेखील होती. देशपांडे हा ‘पेसो’चा कर्मचारीदेखील नसताना त्याच्याकडे कार्यालयीन कागदपत्रे आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘पेसो’मध्ये आणखी ‘लिंक्स’ ?

चारही आरोपींना शनिवारपर्यंत कस्टडी सुनावण्यात आली असून शुक्रवारीदेखील त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. ‘पेसो’चे राष्ट्रीय पातळीवर मोठे महत्त्व आहे. स्फोटकांशी निगडीत कारखान्यांशीच थेट संबंध येत असल्याने प्रत्येक परवानगी सखोल तपासणीनंतरच दिली जाते. अशा स्थितीत पैशांच्या बदल्यात उत्पादनक्षमता वाढविण्याची परवानगी देण्याचा हा प्रकार याअगोदरदेखील झाला आहे का व ‘पेसो’त या लाच रॅकेटच्या आणखी ‘लिंक्स’ आहेत का याचा शोध सुरू आहे.

Web Title: Mismanagement documents found in the house of 'Peso' officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.