नागपूर जिल्ह्यात खड्डे एकीकडे, वृक्षारोपण भलतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:13 PM2018-07-26T12:13:34+5:302018-07-26T12:20:47+5:30
शरद मिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १३ कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली. अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, असा फतवाही त्यांनी काढला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनीही यासाठी चांगलाच घाम गाळला. सर्वत्र उत्तम काम झाले असले तरी भिवापूरच्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र विभागाने ‘खड्डे एकीकडे अन् वृक्षारोपण भलतीकडे’ असा अफलातून कारभार केल्याचे विचित्र चित्र दृष्टिक्षेपास पडत आहे. भिवापूर तालुक्यातील गोंडबोरी शिवारात हा प्रकार झाला असून यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
तालुक्यातील गोंडबोरी फाटा ते गोंडबोरी अशा सुमारे दोन किमी अंतरापर्यंत खड्डे तयार करण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. वनविभागाच्या वतीने हजारावर खड्डे तयारही झाले. याकामासाठी लाखो रुपयांचा खर्च शासनाच्या तिजोरीतून करण्यात आला. ‘एकच लक्ष्य, १३ कोटी वृक्ष’, ‘माझे वृक्ष, माझे जीवन’ अशी सादही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घातली. त्यानंतर वाजतगाजत वृक्षदिंडी काढत सर्वत्र वृक्षारोपणाचा जल्लोष दिसून आला. सर्वत्र अत्यंत गंभीरतेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आटोपला. असे असले तरी गोंडबोरी शिवारात ‘वृक्ष छोटे आणि खड्डे मोठे’असे चित्र दिसून आले.
यामुळे सदर भागात मोठा खर्च करीत तयार केलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण न करता जवळच दुसरा खड्डा नव्याने तयार करीत कसेबसे उरकवण्यात आले.
आॅन दि स्पॉट चौकशी
गोंडबोरी फाटा ते गोंडबोरी सुमारे दोन किमी अंतरापर्यंत साधारणत: दोन बाय दोनचे हे खड्डे तयार केल्यानंतरही याठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली नाही. बाजूलाच कसातरी दुसरा खड्डा तयार करीत त्यात वृक्षारोपण करण्यात आले. नियमाप्रमाणे केलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करायचेच नव्हते तर शासनाचे लाखो रुपये या उपक्रमात खर्च का करण्यात आले, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. सोबतच याप्रकरणाची ‘आॅन दि स्पॉट’ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आहे.