नागपूर रेल्वेस्थानकावर मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:17 AM2018-04-12T11:17:50+5:302018-04-12T11:18:02+5:30
उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
उन्हात धावपळ करून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर मिस्ट कूलिंग सिस्टीमने पाण्याचे फवारे उडाल्यानंतर त्यांना दिलासा मिळतो. याशिवाय उन्हाळ्यात स्लिपरक्लास, जनरल कोचमधील प्रवाशांनाही दिलासा मिळतो. परंतु रेल्वे प्रशासनाने उन्हाळा सुरू होऊनही रेल्वेस्थानकावरील मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच रेल्वे प्रशासनाने वृत्ताची दखल घेऊन ती सुरू केली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वरील प्रवाशांना आता मिस्ट कूलिंग सिस्टीममुळे दिलासा मिळाला आहे. उन्हामुळे त्रस्त झाल्यानंतर अंगावर थंड पाण्याचे फवारे उडाल्यामुळे शरीराचे तापमान ४ ते ५ अंशाने कमी होत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
जूनपर्यंत सुरू राहावी सुविधा
रेल्वेस्थानकात सुरू असलेली ही सुविधा प्रवाशांना दिलासा देणारी आहे. नागपुरात जूनपर्यंत प्रचंड उकाडा असतो. प्रवाशी उकाड्याने त्रस्त होतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सर्व प्लॅटफॉमवर किमान पावसाळा सुरू होईपर्यंत ही सुविधा ठेवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.