हरविलेल्या श्वानाची मालकाशी झाली भेट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:08 AM2021-01-09T04:08:18+5:302021-01-09T04:08:18+5:30
नागपूर : माणूस आणि प्राणी यांच्या नात्यातील भावूक करणारा प्रसंग शुक्रवारी शहरातील कडबी चाैक परिसरात अनुभवायला मिळाला. अनेक दिवसांपासून ...
नागपूर : माणूस आणि प्राणी यांच्या नात्यातील भावूक करणारा प्रसंग शुक्रवारी शहरातील कडबी चाैक परिसरात अनुभवायला मिळाला. अनेक दिवसांपासून हरविलेला घरचा श्वान अचानक घरापर्यंत पाेहचल्याने कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. घरातील सदस्यांनी त्याला कवटाळून घेतले आणि ताे श्वानही भावूक झाला. पशुप्रेमी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे मालकाशी भेट घडविण्यात यश आले.
३१ डिसेंबरच्या दिवशी लॅब्राडाेर प्रजातीचा एक श्वान कडबी चाैक परिसरात बेवारसपणे फिरताना आदेश वैरागडे यांना दिसला. त्यांनी मालकाचा पत्ता लावण्याचा प्रयत्न केला पण ते कुठेच सापडले नाही. यादरम्यान काही तरुणांनी तेथे पाेहचून हा कुत्रा आपला असल्याचा दावा केला व साेबत घेऊन गेले. त्यांच्या हालचालीवर संशय आल्याने वैरागडे यांनी आरएडी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेश व पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बाेधाने यांच्याशी संपर्क साधला. ते लागलीच घटनास्थळी पाेहचले आणि त्यांनी संशयित व्यक्तीकडून श्वानाची सुटका केली. त्या श्वानाच्या देखभालीसाठी पशुप्रेमी कांचन बघेले यांच्याकडे ठेवण्यात आले. या काळात श्वानाचे फाेटाे घेऊन राजेश व स्वप्निल बाेधाने यांनी हा परिसर पिंजून काढला. मात्र मालकांचा पत्ता लागला नाही. यानंतर त्यांनी साेशल मीडियावर फाेटाे टाकून व्हायरल केले. अखेर शुक्रवारी सकाळी कडबी चौक निवासी गुरुचरण सिंग बवेजा व हरपाल सिंग बवेजा यांनी संपर्क करून ताे कुत्रा आपला असल्याचा दावा केला. त्यांच्या घरी जाऊन चाैकशी केल्यानंतर तेच खरे हक्कदार असल्याचा विश्वास मिळाला आणि त्यांच्याकडे श्वान साेपविण्यात आला.
या श्वानाचे नाव ऑडी ठेवले हाेते. त्यांनी हाक मारताच ताे धावत त्यांच्याजवळ गेला. त्यांनीही ऑडीला जवळ घेऊन कवटाळले. ताे हरविल्यामुळे घरातील सदस्य दु:खी हाेते. मात्र त्याची भेट हाेताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. या भेटीसाठी चाललेले एलवीन बघेले, कांचन बघेले, आदेश वैरागडे, अरविन बघेले व स्वप्निल बाेधाने यांचे प्रयत्न फळाला आले.