‘मिशन-१२५’वर महामंथन
By admin | Published: January 24, 2017 02:37 AM2017-01-24T02:37:29+5:302017-01-24T02:37:29+5:30
मुंबई महापालिकेतील युतीवरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा सुरूच असताना नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
योगेश पांडे ल्ल नागपूर
मुंबई महापालिकेतील युतीवरून शिवसेना-भाजपामध्ये कलगीतुरा सुरूच असताना नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्यात सोमवारी रात्री नागपुरात महत्त्वाची बैठक झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या ‘मॅरेथॉन’ बैठकीत मुंबई मनपातील युतीसोबतच नागपुरातील भाजप उमेदवारांच्या यादीबाबत यावेळी चर्चा झाली. नागपुरात युतीबाबत चर्चा सुरू ठेवण्याच्या सूचना या दोन्ही नेत्यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपातर्फे ३००२ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यात आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह संघ परिवारातील व्यक्तींचादेखील समावेश आहे. त्यामुळे तिकीट नेमके कुणाला द्यावे, याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी हेच करणार आहेत, हे स्पष्ट आहे.गडकरी सोमवारी विदेश दौऱ्यावरून परतले, तर मुख्यमंत्रीदेखील सायंकाळी नागपुरात आले.रात्री ८ च्या सुमारास गडकरी ‘रामगिरी’वर पोहोचले. यानंतर बैठकीला सुरुवात झाली. यावेळी खा.अजय संचेती, खा.डॉ.विकास महात्मे, शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष आ.अनिल सोले यांच्यासह शहरातील आमदार व मुख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या बैठकीत सक्षम उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली. शहर पदाधिकाऱ्यांची मतेदेखील दोन्ही नेत्यांनी जाणून घेतली. बहुतांश प्रभागांमधील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. काही प्रभागांतील उमेदवारांच्या नावांनादेखील लवकरच हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. नागपुरात शिवसेनेसोबत युती करावी की नाही, याबाबतदेखील दोघांनी मते जाणून घेतली. राजकीय समीकरणे लक्षात घेता एकदम टोकाचा निर्णय न घेता, सध्या चर्चा सुरू ठेवण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नेत्यांच्या सूचना, उमेदवारांवर चर्चा : कोहळे
मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांना स्थानिक मुद्यांचीदेखील जाण आहे. मुलाखती झाल्यापासून त्यांच्याशी निवडणूक संचालन समितीची बैठक झालीच नव्हती. त्यामुळे सोमवारी बैठक झाली. यात उमेदवारांच्या नावांवर चर्चा झालीच. यादी लवकरच अंतिम करण्यात येईल. शिवाय त्यांनी निवडणुकांबाबत मौलिक सूचना केल्या. युतीबाबत चर्चा सुरू ठेवण्याबाबतदेखील त्यांनी सांगितले, अशी माहिती शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली.
शिक्षक मतदारसंघाचा घेतला आढावा
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचे राजकारणदेखील तापले आहे. भाजपपुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्या बाजूने हे दोन्ही नेते आहेत, ही बाब जगजाहीर आहे. मात्र संघ परिवारातील अनेकांचे संजय बोंदरे यांना समर्थन आहे. याबाबतीतदेखील या बैठकीत चर्चा झाली. गाणार यांची मते फुटता कामा नये, यादृष्टीने गडकरी व मुख्यमंत्री संघाशी समन्वय साधणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांनी या निवडणुकीच्या एकूण तयारीचा आढावा घेतला, अशी माहिती एका आमदाराने गोपनीयतेच्या अटीवर दिली.