मिशन अॅडमिशन; संकेतस्थळावर नोंदणी केल्याशिवाय कुठल्याच महाविद्यालयात प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 11:12 AM2021-08-05T11:12:45+5:302021-08-05T11:13:54+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांच्या पातळीवरच अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शिक्षण मंडळ व सीबीएसई बारावीचे निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष प्रवेशप्रक्रियेकडे लागले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांच्या पातळीवरच अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी केल्याशिवाय कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही.
बारावीच्या निकालानंतर विद्यापीठाने लगेच प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. गुरुवारपासून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली असून, १८ ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांतून गुणपत्रिका आणणे तसेच इतर कागदपत्रांसाठी धावाधाव करणे या गोष्टी पाहता ही मुदत अपुरी पडण्याची शक्यता आहे.
संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर त्याचे प्रिंटआऊट घेऊन ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तेथे २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करायचा आहे. संकेतस्थळावर नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोंदणीतूनच मिळणार लाखोंचा महसूल
मागील वर्षी नोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आले नव्हते. परंतु यंदा मात्र नोंदणीसाठी प्रतिविद्यार्थी २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये १ लाख ५ हजार २५६ विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील अर्धे विद्यार्थी अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आले तरी विद्यापीठाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.
...असे आहे वेळापत्रक
प्रक्रिया - तारीख
वेब पोर्टलवर नोंदणी - ५ ते १८ ऑगस्ट
महाविद्यालयात अर्ज दाखल करणे - २० ऑगस्टपर्यंत
गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी - २४ ऑगस्ट
प्रवेश निश्चिती - २५ ते २८ ऑगस्ट
प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश - ३० ते ३१ ऑगस्ट
नोंदणीची प्रक्रिया
१ - सर्वात अगोदर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल
२ - विद्यापीठाकडून लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात येईल
३- विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी अर्ज भरावा लागेल.
४- अर्ज भरताना विद्यार्थ्यांना इतर माहितीसोबतच छायाचित्र, स्वाक्षरी व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
५- गुणपत्रिकेशिवाय इतर कागदपत्रे उपलब्ध नसली तरी विद्यार्थी प्रवेश नोंदणीची प्रक्रिया करू शकतील.
६- अर्ज भरल्यावर विद्यार्थ्यांना ‘एआरएन’ (अॅडमिशन रजिस्ट्रेशन नंबर) मिळेल.
७- महाविद्यालयांत अर्ज करताना विद्यार्थ्यांना ‘एआरएन’ सादर करावा लागेल.
८- महाविद्यालयांत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येईल.
९- प्रवेश निश्चित झाल्यावर सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे ‘एआरएन’ संकेतस्थळावर अपडेट होतील.