नागपुरातही ‘मिशन बिगीन अगेन’ : मनपा आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:13 PM2020-06-01T23:13:35+5:302020-06-02T01:51:17+5:30
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महापालिकेने कायम ठेवले आहे. कंटेनमेंट झोन वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्यात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. ३ जूनपासून हे आदेश लागू होणार असून ३० जूनपर्यंत कायम राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आटोपलेल्या चार लॉकडाऊननंतर आता लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ‘मिशन बिगीन अगेन’ या शीर्षकांतर्गत सुरू झाला आहे, राज्य शासनाने यासंदर्भात काढलेले आदेश नागपूर महापालिकेने कायम ठेवले आहे. कंटेनमेंट झोन वगळता टप्प्याटप्याने तीन टप्प्यात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. ३ जूनपासून हे आदेश लागू होणार असून ३० जूनपर्यंत कायम राहतील.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी जाहीर केलेल्या आदेशानुसार, ३ जूनपासून नागपूर शहरात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. हे करताना नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोङ्मिड-१९ संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे पालन करायचे आहे. ‘मिशन बिगीन अगेन’चा प्रारंभ होत आहे.
पहिल्या टप्प्यात या बाबींना परवानगी
सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगिच्यांमध्ये, खासगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगिचे या ठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.
कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.
प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी.
गॅरेज तसेच वर्कशॉप यांना अपॉइंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी.
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचारी वर्ग अथवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.
दुसरा टप्पा ५ जूनपासून; बाजारातील दुकानांना परवानगी
सर्व मार्केट, दुकाने यांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट संकुल यांना सम-विषम पद्धतीने उघडण्यास परवानगी.
कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रूमची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खरेदी केलेली वस्तू परत घेण्याची व्यवस्था अमलात असणार नाही.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असेल. त्याकरता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.
लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी. मोटराईज्ड गाड्यांद्वारे शॉपिंग करण्याला अनुमती नाही.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.
वाहनांमध्ये येणेप्रमाणे लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसंच कॅब- १+२, रिक्षा-१+२, चारचाकी- १+२, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी.)
टप्पा तीन ८ जूनपासून
खासगी ऑफिसेस १० टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात माहिती देणे अनिवार्य.
या आदेशानुसार परवानगी असलेल्या बाबींना पुन्हा वेगळ्या परवानगीची गरज नाही.
दिशा व तिथीनुसार उघडणार दुकाने
‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायम राहतील. उर्वरित शहरात नवीन सवलती असतील. बाजारपेठा सशर्तपणे उघडल्या जाऊ शकतात. नागपुरातही रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू राहील तर ३, ५ आणि ८ जूनपासून सवलती सुरू होतील. मॉल आणि मार्केट, कॉम्प्लेक्स वगळता इतर सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु आॅड व इव्हनच्या व्यवस्थेबरोबरच नागपूर शहरात दुकानाच्या गेटच्या दिशेवरूनही दुकाने कोणत्या दिवशी उघडायची हे ठरणार आहे. यामुळे संभ्रम झाल्यास झोनच्या सहायक आयुक्तांशी चर्चा करून संभ्रम दूर करता येईल. नवीन आदेशानुसार एका दिवशी रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू राहील. ऑड तारखेला उत्तर ते पूर्व व दक्षिण ते पूर्वेकडील दुकाने तर ईवन तारखेला उत्तर ते पश्चिम व दक्षिण ते पश्चिमेकडे तोंड असलेली दुकाने उघडी राहतील.
राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी नागपूर शहरासाठी तीन टप्प्यात सवलती देण्याचे आदेश जारी केले. शहरात सध्या सार्वजनिक वाहतूक सुरू होणार नाही, असे जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. कॅब, ई-रिक्षा, चारचाकी वाहने आवश्यक परिस्थितीत वापरता येईल. ६५ वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षाखालील मुलांना घराबाहेर पडू देऊ नका. नागपूर शहरात, जीवनावश्यक वस्तू व इतर आवश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सेवा प्रतिबंधित क्षेत्रात बंद राहतील.
पानठेल्यांबाबत संभ्रम
आदेशात सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू सेवन करण्याला निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु आदेशात यांचा कुठेही उल्लेख नस्ल्याने पानठेले उघडणार की बंद राहणार, याबाबत संभ्रम आहे. यामुळे आदेशासंदर्भात चर्चा रंगू लागली आहे. मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, थुंकण्यावर व पान, तंबाखू खाण्यावर बंदी असल्याने अर्थातच पानठेले बंद राहतील.
कोणत्या गोष्टी बंद राहतील?
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक
मेट्रो रेल्वे
रेल्वेची नियमित वाहतूक
सिनेमाघरे, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि आॅडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणे.
कोणत्याही स्वरूपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे
सलून, स्पा, ब्युटी पार्लर
शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.
काय पाळणे आवश्यक?
मास्क : सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक आहे.
फिजिकल डिस्टन्सिंग : सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने इतरांपासून किमान ६ फुटांचे अंतर राखले पाहिजे. दुकानदाराने ग्राहकांसाठी हा नियम घालून द्यावा व एकाच वेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक असता कामा नये.
समारंभ : समारंभ/कार्यक्रम यावरील बंदी कायम राहील. विवाहासाठी ५०पेक्षा अधिक लोकांना हजर राहण्याची परवानगी असणार नाही. अत्यंसंस्कारासाठी २०पेक्षा अधिक लोकांना हजर राहण्याची परवानगी नाही.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड ठोठावण्यात येणार आाहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू इत्यादीचे सेवन करण्यात मनाई करण्यात आली आहे.
वर्क फ्रॉम होम : शक्यतो सर्वांनी वर्क फ्रॉम होम करावे.
स्क्रीनिंग हायजीन : प्रवेश करतेवेळी व बाहेर जातेवेळी थर्मल स्कॅनिंग, हॅण्ड वॉश व सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे.
वारंवार सॅनिटायझेशन : कामाच्या संपूर्ण ठिकाणी आणि जो भाग वारंवार सर्वांच्या संपर्कात येतो तिथे प्रत्येक शिफ्टच्यामध्ये सॅनिटायझेशन केले पाहिजे.
डिस्टन्सिंग : कामाच्या ठिकाणी सर्वांनी एकमेकामासून डिस्टन्सिंग पाळले पाहजे. विशेषत: दोन शिफ्टमधील वेळ, लंच बे्रक आदी वेळी हे पाळले जावे.
यांना घरीच थांबण्याची सूचना
६५ वर्षावरील व्यक्ती, आजारी, गर्भवती महिला, १० वर्षाखालील बालके यांना घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यंत गरजेच्या किंवा वेद्यकीय कारणासाठी बाहेर पडावे, असेही म्हटले आहे.
रात्रीची संचारबंदी
या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टींना शिथिलता देण्यात आली असली तरी रात्री ९ ते सकाळी ५ या काळात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पूर्णपणे संचारबंदी लागू राहील.