‘जी-२०’च्या तोंडावर पोलिसांचे ‘मिशन भिकारीबंदी’; पोलीस आयुक्तांकडून निर्देश जारी

By योगेश पांडे | Published: March 8, 2023 04:48 PM2023-03-08T16:48:02+5:302023-03-08T16:50:47+5:30

वाहतूक चौकांवर भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार

'Mission Bhikaribandi' by police in the face of 'G-20'; Instructions issued by the Commissioner of Police of begging ban in nagpur | ‘जी-२०’च्या तोंडावर पोलिसांचे ‘मिशन भिकारीबंदी’; पोलीस आयुक्तांकडून निर्देश जारी

‘जी-२०’च्या तोंडावर पोलिसांचे ‘मिशन भिकारीबंदी’; पोलीस आयुक्तांकडून निर्देश जारी

googlenewsNext

नागपूर : मागील अनेक वर्षांपासून नागपूर शहरात चौकाचौकांत उभे राहून भीक मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याविरोधात नागरिकांकडून वारंवार ओरड होत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र काही दिवसांवर आलेल्या ‘जी-२०’च्या तोंडावर नागपूर पोलिसांना या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. चौकांमध्ये भीक मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत.

शहरातील विविध चौकांमध्ये एकट्याने किंवा एकत्रितपणए भीक मागितली जाते. वाहनचालकांकडून पैसे मिळावे यासाठी अनेकदा जबरदस्तीदेखील करण्यात येते. तसेच विविध पद्धतीने त्रासदेखील देण्यात येतो. काही वेळा तर चक्क आक्षेपार्ह कृत्यदेखील करण्यात येते. हे लोक अचानक वाहनांसमोर येतात व त्यामुळे भीषण अपघातांचादेखील धोका असतो. शिवाय वाहतुकीची कोंडीदेखील होते. अनेक भिकाऱ्यांच्या गटांनी फुटपाथदेखील काबीज केले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनादेखील त्रास होतो. बरेचदा काही भिकारी अंमली पदार्थांच्या नशेत रस्त्यांवर उपद्रव करतात.

यासंदर्भात लोक तक्रारीसाठी समोर येत नव्हते व पोलीस किंवा मनपा प्रशासनाकडूनदेखील केवळ थातुरमातूर कारवाईच केली जात होती. जी-२० च्या पार्श्वभूमीवर अगोदरच शहरातील अनेक भिकारी बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील चौकांमधील उपद्रव नियंत्रणात यावा, यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार वाहतूक सिग्नल व रस्त्याच्या कडेला तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भीक मागण्यास बंदी घालण्यात आली आहे. जे लोक याचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. सद्यस्थितीत ९ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत हे निर्देश लागू राहतील, असे पोलीस आयुक्तांनी अधिसूचनेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

आक्षेप पाठविण्याचे आवाहन

दरम्यान, या अधिसूचनेसंदर्भात आक्षेप असल्यास त्याबाबतीतील ई-मेल किंवा पत्र पोलीस भवन, सिव्हील लाईन्स येथे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारपासून ही मोहीम राबविली जाणार आहे.

Web Title: 'Mission Bhikaribandi' by police in the face of 'G-20'; Instructions issued by the Commissioner of Police of begging ban in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.