कोरोनाबाधित वकिलांना मदतीसाठी मिशन निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:11 AM2021-05-05T04:11:21+5:302021-05-05T04:11:21+5:30
नागपूर : गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे नागपुरातील ४० ते ५० वकील व त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे ...
नागपूर : गेल्या दोन महिन्यात कोरोनामुळे नागपुरातील ४० ते ५० वकील व त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे विधिक्षेत्र हळहळले आहे़ भविष्यात अशा घटना टाळता याव्यात आणि या संकटकाळात प्रत्येक गरजू वकिलाला आवश्यक मदत मिळावी, याकरिता मिशन निर्धार उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ सुमारे १०० वकिलांनी वकिलांसाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे़
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे सदस्य अॅड. पारिजात पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत जबाबदारीनिहाय विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत़ या समित्या गरजू वकिलांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, कोरोना चाचणी करण्यासाठी व त्याचा अहवाल तातडीने मागविण्यासाठी प्रयत्न करणे, रुग्णालयांमध्ये खाटांची उपलब्धता तपासून वकिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना भरती करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करून देणे, ब्लड प्लाझ्मा मिळवून देणे, रक्तदाते उपलब्ध करून देणे, गृह उपचाराकरिता वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे, लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे, घरी भोजन उपलब्ध करून देणे, सकारात्मक विचारांची पेरणी करणे इत्यादी कामे करणार आहेत़ प्रत्येक समितीमधील सदस्य व त्यांचे मोबाईल क्रमांक समाजमाध्यमांमार्फत सार्वजनिक करण्यात आहेत़ गरजू वकील त्याला आवश्यक असलेली मदत मिळविण्यासाठी संबंधित समितीमधील सदस्यांशी संपर्क साधत आहेत़ या उपक्रमामुळे वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे़