मिशन नायलॉन मांजा
By admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:12+5:302016-01-02T08:37:12+5:30
नायलॉन मांजा जप्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गत इतवारी व शुक्रवारी
नागपूर : नायलॉन मांजा जप्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गत इतवारी व शुक्रवारी परिसरातून ४० हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. याशिवाय विविध संस्थांनीही शुक्रवारी बडकस चौकात एकत्र येत चायनीज नायलॉन, ग्लास कोटेड व पक्क्या मांजाविरुद्ध निदर्शने करीत नायलॉन मांजाची होळी केली.
जीवघेणा नायलॉन मांजा शहरात कुठेही विकल्या जात असेल तर तो जप्त करून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पथके नेमली आहेत. ही पथके पुढील काही दिवस शहराच्या विविध भागात फिरून तपासणी करतील. तीळसंक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणात पतंग उडविली जाते. आपली पतंग कटू नये म्हणून बरेच जण न तुटणारा नायलॉन मांजा वापरतात. याचा फायदा घेत विक्रेतेही नायलॉन मांजा विकून पैसे कमवितात. मात्र, हा घातक नायलॉन मांजा कुणाच्या जीवास कारणीभूत ठरू शकतो, याचा विचारही पतंग उडविणारे व विक्रेतेही करीत नाहीत. नायलॉन मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. त्यामुळे या मांजावर निर्बंध घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन नायलॉन मांजा विरोधात कारवाईसाठी सक्रिय झाले आहे.
वाईल्ड लाईफ वेलफेयर सोसायटीच्या बॅनरखाली जॉइंट्स ग्रुप आॅफ आॅरेंज सिटी, पीपल फॉर अॅनिमल्स, आयसॉ, उज्ज्वल गोरक्षण, ग्रीन विजिल, सृष्टी, राधाकृष्ण सार्इंधाम गोशाळा, वाईल्ड-सर, बॅड बॉईज ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी बडकस चौकात चायनीज नायलॉन, ग्लास कोटेड व पक्का मांजाच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी नायलॉन मांजाची होळी करण्यात आली. वाईल्ड लाईफ वेलफेयर सोसायटीचे पंकज बादुले यांनी सांगितले की, घातक मांजा विरोधात शहरातील नऊ संस्था एकत्र आल्या आहेत. बंदी असलेला चायनीज नायलॉन मांजाची बाजारात विक्री करताना आढळले तर या विरोधात सर्व संस्था तीव्र आंदोलन करतील. नितीश भांदककर म्हणाले, गेल्यावर्षी मांजामुळे ४५० पक्षी जखमी झाले होते.
यापैकी काही पक्ष्यांचेच जीव वाचविण्यात यश आले. पीपल फॉर अनिमल्सचे मनोज ठक्कर म्हणाले, मांजामुळे झाडांवर घरटे करून राहणाऱ्या पक्ष्यांचाही मृत्यू होतो. आंदोलनात घानश्याम मेहता, सुबोध आचार्य, संकेत आंबेकर, कौस्तुभ चटर्जी, प्रमोद कानेटकर, करिश्मा गलानी आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)