‘नॅक’साठी विद्यापीठाचे ‘मिशन ए प्लस’ : विनायक देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:10 PM2019-07-17T22:10:18+5:302019-07-17T22:11:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर सद्यस्थितीत ‘नॅक’ मूल्यांकनाचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विद्यापीठाला जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या तयारींवर जोर देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर सद्यस्थितीत ‘नॅक’ मूल्यांकनाचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विद्यापीठाला जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या ‘नॅक’च्या मूल्यांकनात ‘ए प्लस’ श्रेणी मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या तयारींवर जोर देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्यकारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी दिली.
डॉ.देशपांडे यांनी मंगळवारी कार्यकारी प्र-कुलगुरूपदाची जबाबदारी स्वीकारली. बुधवारी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुढील कार्याची भूमिका विषद केली. विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागांसोबतच शैक्षणिक विभागांच्या विकासावरदेखील लक्ष देण्यात येईल. याची तयारी सुरु झाली आहे. परीक्षा विभागाच्या कामाला आणखी पारदर्शक व वेगवान बनविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. समस्या दूर व्हावी यासाठी शिक्षकांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदेदेखील याचप्रमाणे भरण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अगोदर आम्ही ‘आऊटसोर्सिंग’बाबत विचार केला होता. मात्र नंतर मनपरिवर्तन केले. परीक्षा विभागाचे काम गोपनीय असते. अशा स्थितीत एखाद्या खासगी कंपनीला जबाबदारी देणे धोकादायक ठरु शकते. पदभरतीसाठी बैठका सुरु आहेत व लवकरच काहीतरी उपाय नक्कीच समोर येईल, अशी माहितीदेखील डॉ.देशपांडे यांनी दिली.