तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मिशन लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:30+5:302021-05-08T04:09:30+5:30
भिवापूर : कोरोनावर सध्या तरी परफेक्ट असा औषधोपचार नाहीच. प्रतिकारशक्तीच्या बळावर लढा सुरू आहे. पहिल्यापेक्षा दुसरी आणि भविष्यात वर्तविली ...
भिवापूर : कोरोनावर सध्या तरी परफेक्ट असा औषधोपचार नाहीच. प्रतिकारशक्तीच्या बळावर लढा सुरू आहे. पहिल्यापेक्षा दुसरी आणि भविष्यात वर्तविली गेलेली तिसरी लाट भयंकर असणार आहे. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण हाच ‘रामबाण’ उपाय आहे. त्यामुळे तालुका आपत्ती व्यवस्थापनाने प्रथम प्राधान्याने मिशन लसीकरण सुरू केले आहे. प्रत्येक गावात आणि प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी युद्धपातळीचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात बंजारा बांधवांची वस्ती असलेल्या मांडवा (लभान) येथेसुद्धा गुरुवारी प्रशासनाची टीम लसीकरणासाठी पोहोचली. दरम्यान ८२ वर्षीय लता राठोड या आजीने स्वत:हून पुढे येत लसीकरण करून घेतले. त्यानंतर येथे तब्बल १११ महिला व पुरुषांनी लस घेतली. तालुक्यात एकूण १३७ गावांचा समावेश आहे. प्रत्येक गावात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे पथक दाखल होत आहे. सकाळी १० ते ५ पर्यंत लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत ५० वर गावात लसीकरण करणारी टीम पोहोचली आहे. यात शहरात ४,५२२ तर ग्रामीण मध्ये १३,६१४ अशा प्रकारे तालुक्यात १८,१३६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मांडवा (लभान) येथे लसीकरण करणाऱ्या पथकात डॉ. अश्विनी पवार, अधिपचारिका हेमलता वंजारी, शिक्षक उकला राठोड, विजय ढाकणे, संध्या शेगोकर, सुभाष तिमांडे, विठ्ठल राजुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय मडकवार, डॉ. केवल कोरडे, ज्ञानेश्वर सरोदे, कोविड नियंत्रण कक्ष अधिकारी विनोद डहारे, अनिल मेघावत उपस्थित होते.
-
आठवडाभरापासून तालुक्यात संसर्ग ओसरू लागला आहे. भविष्यात येऊ पाहणारी तिसरी लाट याहूनही भीषण असण्याची शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरणार आहे. लसीकरणाबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही गावोगावी जाऊन जनजागृती करीत आहोत. त्यामुळे गत काही दिवसांपासून लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. लस सुरक्षित असून, प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे. लसीकरणाच्या बळावरच कोरोनावर मात करणे शक्य आहे.
- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार, भिवापूर
--
स्वयंस्फूर्तीने लस घेताना मांडवा (लभान) येथे ८२ वर्षीय लता राठोड.