मिशनरीजकडून होत आहे, पोपच्या आदेशाचे उल्लंघन! फादर फ्रान्सिस दिब्रिटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 09:56 PM2019-11-05T21:56:21+5:302019-11-05T21:59:51+5:30
४०० वर्षापूर्वी भारतात आलेल्या ख्रिश्नच मिशरीजपैकी काहींनी पोपच्या आदेशाला धुडकावून लावत, धर्मप्रसाराचे काम केल्याचा आरोप प्रख्यात साहित्यिक व समाजसेवक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ४०० वर्षापूर्वी भारतात आलेल्या ख्रिश्नच मिशरीजपैकी काहींनी पोपच्या आदेशाला धुडकावून लावत, धर्मप्रसाराचे काम केल्याचा आरोप प्रख्यात साहित्यिक व समाजसेवक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे केला.
उस्मानाबाद येथे होऊ घातलेल्या ९३ व्या अ.भा. मराठीसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघातर्फे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते दिब्रिटो यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी, ते बोलत होते.
४०० वर्षापूर्वी इंग्लंडहून ख्रिश्चन मिशनरी भारतात उतरले. तेव्हा, पोपने मिशनरीच्या सदस्यांना भारताला असलेल्या सर्वोच्च सांस्कृतिक वारसाची माहिती दिली होती. भारतात जाताना तेथील संस्कृतिक समृद्धीला धक्का लावू नका, धर्मप्रसार करू नका, त्या संस्कृतिक स्वत:ला सामावून घ्या आणि येसू ख्रिस्ताच्या संदेशाचा प्रसार करा, असे आदेश पोपने केले होते. पोपच्या त्या आदेशाला धुडकावून लावत धर्मप्रसार झाला. येथील संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृती थोपण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, त्यामुळे धार्मिक हानी झाली नाही, हेही खरे असल्याचे दिब्रिटो यावेळी म्हणाले.
मी जेव्हा ‘फादर‘ होण्यासाठीचा अभ्यास करण्यास हाती घेतला. तेव्हा, चर्चच्या लायब्ररीमध्ये महाराष्ट्रातील संतांचेच साहित्य दिसले. तुकारामांचे अभंग वाचल्यावर लक्षात आले की बायबल आणि अभंगामधील उपदेशात कोणताच फरक नाही. ही जाणीव दूर करण्याची भूमिका साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीचा समाजधर्म हा हिंदूच आहे आणि आम्ही सुद्धा भारतीय हिंदूच आहोत. परदेशात आम्हालाही हिंदू म्हणूनच संबोधले जाते. प्रत्येकाची उपासना, आराधना पद्धती वेगळी आहे. असे असतानाही, सर्व एकोप्याने राहतो. हिंदू संस्कृतीच्या स्वभावधर्मामुळेच हे शक्य झाल्याचे दिब्रिटो म्हणाले. यावेळी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, सरचिटणीस विलास मानेकर, विलास देशपांडे उपस्थित होते. निवेदन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
मराठी साहित्यिक वर्ग भूमिकाहीन, मग अभिजात दर्जा कसा मिळेल?
जिथे पर्यावरण तिथे साहित्यिकांनी असावे. मात्र, वर्तमानातील साहित्यिक भूमिकाहीन असल्याचा आरोपही दिब्रिटो यांनी लावला. आरे कॉलनीतील दोन हजार झाडांची एका रात्रीत कत्तल करण्यात आली. मात्र, त्याविरोधात एकही मराठी साहित्यिक रस्त्यावर उतरला नाही किंवा साधा विरोधी शब्द उच्चारला नाही. जेव्हा संकट येते तेव्हा मंदिर किंवा मशिदीत जाऊन काहीच उपयोग होत नाही. संकटाचा सामना करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. मात्र, मराठी साहित्यिकांमध्ये तो संघर्ष करण्याची क्षमता दिसत नाही. हे साहित्यिक स्वत:चीच अभिजातता विसरले तर मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधीच मिळणार नाही, असे दिब्रिटो म्हणाले. संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मराठी साहित्यिक कधी घेतील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.