रेल्वे स्थानकावर 'ठंडा ठंडा, कुल कुल'; प्रवाशांना मिळणार आल्हाददायक अनुभूती
By नरेश डोंगरे | Published: April 1, 2024 10:56 PM2024-04-01T22:56:50+5:302024-04-01T22:57:20+5:30
मिस्ट एअर सिस्टम, 'वर्ल्ड क्लास' रेल्वे स्टेशनच्या रुपात झपाट्याने विकसित होत असलेल्या नागपूर स्थानकावर मिस्टिंग सिस्टम कार्यान्वित करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले होते.
नागपूर : रेल्वे गाड्या आणि स्थानकावरील प्रचंड गर्दी, त्यात तीव्र तापमानामुळे होणारी अंगाची लाही-लाही उन्हाळ्यात प्रवाशांना कमालीची अस्वस्थ करून जाते. ही बाब ध्यानात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर 'मिस्टिंग सिस्टम' कार्यान्वित केली आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावर 'ठंडा ठंडा, कुल कुल'ची आल्हाददायक अनुभूती मिळणार आहे. सोमवारी या सिस्टमची ट्रायल घेण्यात आली असून मंगळवारपासून ती उन्हाळाभर कार्यान्वित राहणार आहे.
उन्ह्याळ्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागत असल्यामुळे अनेकजण सहपरिवार नातेवाईकांकडे, बाहेरगावी फिरायला जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे ईतर ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात रेल्वे स्थानके अन् गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. प्रतिक्षालयातही जागा नसते. त्यामुळे तीव्र उन्हाच्या तडाख्यात, गर्दीत प्रवासाला निघालेल्या अनेकांना वातावरण असह्य होतो. अनेक जण अस्वस्थ होतात अन् त्यांची चिडचिडही होते. हे सर्व ध्यानात घेऊन 'वर्ल्ड क्लास' रेल्वे स्टेशनच्या रुपात झपाट्याने विकसित होत असलेल्या नागपूर स्थानकावर मिस्टिंग सिस्टम कार्यान्वित करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले होते.
ही सिस्टम प्लेटफॉर्मच्या छतावर लावली जाते. बारिक पाईपच्या प्रत्येकी दोन मिटरवर एक पॉईंट असतो. त्याला सूक्ष्म छिद्र असतात. ही सिस्टम अॅटोमेटिक असल्याने फलाटावर रेल्वेगाडी येताच ही सिस्टम सुरू होते. पाईपमधून धूर बाहेर यावा तसे थंड पाण्याचे फवारे खाली येतात. त्यामुळे प्रवाशांना आल्हाददायक अनुभूती मिळते.
आजपासून तीन फलाटांवर सेवा
आज मंगळवारपासून ही सिस्टम फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४ आणि ५ क्रमांकाच्या फलाटावर आणि नंतर अन्य फलाटावर सिस्टम कार्यान्वित होणार असल्याचे अधिकारी सांगतात. या सिस्टमसाठी १२ लाखांचा खर्च येतो, असेही सांगितले जाते. दरम्यान, या सिस्टममुळे रेल्वे प्रवाशांना उन्हाळ्यात चांगला दिलासा मिळणार आहे.