चूक ‘डीटीई’ची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:02 AM2017-09-26T01:02:48+5:302017-09-26T01:03:01+5:30

The mistake of 'DTE' | चूक ‘डीटीई’ची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

चूक ‘डीटीई’ची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

Next
ठळक मुद्दे‘आॅनलाईन’ शुल्क प्रणालीचा खेळखंडोबा : प्रवेशाच्या वेळी भरले दोन ते तीनदा शुल्क

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया होऊन आता महाविद्यालयेदेखील सुरू झाली आहेत. मात्र प्रवेश घेतल्यानंतरदेखील राज्यभरातील अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक अद्यापही मन:स्ताप सहन करत आहेत.
‘आॅनलाईन’ प्रक्रियेतील अडथळ्यांंमुळे प्रवेशाच्या वेळी अनेकांना दोन ते तीनदा शुल्क भरावे लागले होते. मात्र भरलेले हे अतिरिक्त शुल्क अद्यापही परत मिळालेले नाही. ‘डीटीई’ची (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) चूक असताना आम्ही भुर्दंड सहन का करायचा असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘डीटीई’तर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ जूनपासून सुरू झालेली प्रक्रिया ३ आॅगस्टपर्यंत चालली. १० आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचे होते. ‘कॅप’च्या तीन व अतिरिक्त अशा मिळून एकूण चार फेºयांमध्ये ही प्रक्रिया चालली. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी पाच हजारांचे प्रवेश स्वीकृती शुल्क भरणे अनिवार्य होते.
या शुल्काचा भरणा करण्यासाठी ‘आॅनलाईन’ प्रणाली किंवा ‘डीडी’ (डिमांड ड्राफ्ट) असे पर्याय देण्यात आले होते.
अनेक पालकांनी प्रवेश स्वीकृती शुल्क हे ‘आॅनलाईन’ माध्यमातून भरण्याचा पर्याय निवडला व संबंधित शुल्क भरण्याची प्रक्रिया केली. बँकेच्या खात्यातून पैसे वजा झाल्याचा संदेश तर आला. मात्र ‘डीटीई’च्या खात्यात प्रत्यक्षात त्या दिवशी पैसे जमा झालेच नाही. त्यामुळे मग अनेकांनी पायपीट करून बँकांमधून त्या रकमेचा ‘डीडी’ तयार करून आणला व तो सादर करून प्रवेश निश्चिती केली. अगोदर खात्यातून वजा झालेले पैसे ‘रिफंड’ होतील अशी अपेक्षा होती. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे असे काहीच न होता प्रत्यक्षात हे पैसे दोन ते तीन दिवसांनंतर ‘डीटीई’च्या बँक खात्यामध्ये जमा झाले.
असा प्रकार झाला तर काही दिवसातच पैसे परत विद्यार्थी, पालक अथवा संबंधितांच्या खात्यात वळते होतील, असे ‘डीटीई’ने संकेतस्थळावर स्पष्ट केले होते.
मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. अनेकांनी तर ३० जूनला अशा पद्धतीने शुल्क भरले होते. मात्र जवळपास तीन महिने होऊनदेखील याबाबतीत काहीच दिलासा मिळालेला नाही.
दोन ते तीनदा पैसे झाले वजा
एकदा ‘आॅनलाईन’ प्रणालीने ‘डीटीई’च्या खात्यात प्रवेश निश्चिती शुल्क जमा न झाल्याने काही विद्यार्थी-पालकांनी दोन ते तीन वेळा प्रयत्न केले. प्रत्येक वेळी त्यांच्या खात्यातून पैसे वजा होत गेले. मात्र प्रत्यक्षात ‘डीटीई’च्या खात्यात त्या दिवशी वळते झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने ‘डीडी’ काढून द्यावा लागला व दुप्पट ते तीनपट फटका सहन करावा लागला. यासंदर्भात मुख्यालयाला ‘ई-मेल’ पाठवूनदेखील काहीही झालेले नाही, असे काही पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मुख्यालयाकडे केली विनंती
यासंदर्भात ‘डीटीई’चे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी संपर्क केला असता, यासंदर्भातील तक्रारी आल्याचे त्यांनी मान्य केले. तांत्रिक कारणांमुळे काही पालकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागले. मात्र त्यांचा परतावा ‘डीटीई’कडून निश्चितपणे करण्यात येईल. याबाबतीत मुख्यालयाकडे विनंती अर्ज पाठविला असून लवकरच यासंदर्भात तेथून पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: The mistake of 'DTE'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.