मतदार ओळखपत्रात चुका; युवकांत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:51 PM2019-03-14T22:51:10+5:302019-03-14T22:52:18+5:30
१८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १८ वर्षावरील युवकांना निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी मतदार नोंदणी करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मोहीम निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आली. शहरातील हजारो युवकांनी अर्ज भरून आपली नावे नोंदविली. मात्र अर्जात अचूक माहिती भरलेली असतानाही अनेकांच्या मतदार ओळखपत्रात चुकीची माहिती नोंदविण्यात आली. यामुळे ओळखपत्र असूनही त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे. ओळखपत्रावरील नावातील चुकामुळे युवकात नाराजी आहे.
विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. सोबतच जनजागृतीही करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अर्जात विद्यार्थ्याने आपले नाव श्रेयश राजेश कुंभलकर असे नमूद केले असताना श्रेयश या नावांमध्ये घोळ केला. तसेच वडिलांचे नाव राजेश कुंभारे असे नमूद करण्यात आले आहे, अशा तक्रारी इतरही युवकांनी केलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नागपूर शहरातील २५ हजारांहून अधिक युवकांनी प्रथमच अर्ज भरले. मात्र निवडणूक विभागात नवीन अर्जधारकांची माहिती नोंदविताना चुकीची नोंदविण्यात आली आहे. नावात, वडिलांच्या नावात वा आडनावात चुका आहेत. मतदान करताना मतदार कार्डासोबतच ओळखपत्राची गरज असते. अशावेळी आधार कार्ड, पॅन कार्ड यावरील नाव व मतदार ओळखपत्रातील नावात साम्य नसल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
नावात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू असते. परंतु मतदार यादीतील चुकीची दुुरुस्ती १५ मार्चपूर्वी झाली असती तर त्यांची नावे मतदार यादीत आली असती. त्यांना लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हकक बजावता आला असता. परंतु आता ही वेळ संपत आहे. तसेच चुकीची दुरुस्ती करण्याचे अनेक जण टाळतात. अशा मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.
ओळखपत्र बनविण्यापूर्वी पडताळणी व्हावी
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आलेल्या अर्जातील मजकूर व बनविण्यात येणाऱ्या ओळखपत्रावरील मजकुराची पडताळणी होण्याची गरज आहे. परंतु पडताळणी होत नसल्याने मतदार ओळखपत्रात चुका राहत असल्याची माहिती युवकांनी दिली.
फोटो व मतदार क्रमांकावर मतदान करता येईल
मतदार ओळखपत्रात काही चुका असल्या तर त्या दुरुस्तीसाठी बीएलओकडे अर्ज करता येतो. तसेच किरकोळ चुका असल्या तरी ओळखपत्रावर मतदाराचा फोटो आणि मतदान क्रमांक योग्य असला तरी मतदान करता येईल. त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार नाही. अशा प्रकारच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.
अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी