खासदार निधीचा गैरवापर; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Published: December 12, 2023 10:34 PM2023-12-12T22:34:21+5:302023-12-12T22:34:28+5:30
नागपूर : जिम्नॅशियमऐवजी दुकान बांधून खासदार निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून बाबू हरदास व्यायाम प्रशिक्षण केंद्राचा अध्यक्ष व सचिव यांच्यावर ...
नागपूर: जिम्नॅशियमऐवजी दुकान बांधून खासदार निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून बाबू हरदास व्यायाम प्रशिक्षण केंद्राचा अध्यक्ष व सचिव यांच्यावर जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अध्यक्ष अशोक पुरुषोत्तम नगरारे (६४) आणि सचिव अभिलाष आनंदराव वसे (४०, रा. हरदास नगर, कामठी) अशी आरोपींची नावे आहेत.
जुन्या कामठीत एक जुनी व्यायामशाळा होती. इमारत जीर्ण झाल्याने ती पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एक संस्था स्थापन करून धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केली. बाबू हरदास व्यायाम प्रशिक्षण केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारतीच्या बांधकामासाठी खासदार निधीतून ६ लाख ७७ हजार २०८ रुपये मंजूर करण्यात आले. यासह बाबू हरदास व्यायाम प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले. संस्थेने इमारतीत दुकाने केली व ती लोकांना भाड्याने दिली.
दरम्यान, हरदास नगर येथील रहिवासी राजेश उर्फ आशिष मेश्राम यांनी खासदार निधीचा अध्यक्ष व सचिवांनी गैरवापर केल्याची तक्रार पोलिसांत केली. आरोपींनी खासदार निधीतून व्यायामशाळेऐवजी दुकाने बांधली व त्यांना भाड्याने देऊन पैसे घेतले. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने मेश्राम यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या सूचनेवरून जुनी कामठी पोलिसांनी गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.