सोशल मिडियाचा गैरवापर; पोलिसांचे 'प्रोफाईल’ नियमित तपासण्याचे फर्माण
By नरेश डोंगरे | Published: September 25, 2022 09:31 PM2022-09-25T21:31:01+5:302022-09-25T21:31:14+5:30
पोलीस महासंचालनालयातून त्या घटनेची गंभीर दखल
नागपूर : राज्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर नको तशा पोस्ट अपलोड करून उभ्या पोलीस दलाची कोंडी केल्यामुळे पोलीस महासंचालनालयाने त्यांची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, कार्यालयीन घटकप्रमुखाने प्रत्येक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचे नियमित 'सोशल मिडिया प्रोफाईल तपासावे’ असे आदेश पोलीस महासंचालनालयाने जारी केले.
रेल्वे पोलिसांसह राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक, सर्व आयुक्त, गुन्हे अण्वेषण विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकालाही हे आदेश वजा पत्र पाठविण्यात आले. शनिवारी बहुतांश कार्यालयात हे आदेश धडकले आहे. अफवांचे रान पेटवणाऱ्या सोशल मिडियाचा हल्ली मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे वारंवार उघड होत आहे. काही समाजकंटक जाणीवपूर्वक चिथावणीखोर मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात. त्याची कसलीही शहानिशा होत नाही अन् झपाट्याने व्हायरल झालेले हे मेसेज, फोटो, व्हिडीओ जातिय तणावच नव्हे तर दोन गटात संघर्षही निर्माण करतात. त्यामुळे अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होते, असे त्यात म्हटले आहे.