नागपुरात एमआयटीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:44 PM2020-06-06T20:44:40+5:302020-06-06T21:37:06+5:30
पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शिवानी प्रशांत टेकाडे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती धंतोलीतील निर्मल अपार्टमेंटमध्ये राहत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शिवानी प्रशांत टेकाडे (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती धंतोलीतील निर्मल अपार्टमेंटमध्ये राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानीच्या वडिलांचा जानेवारी महिन्यात अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून शिवानी कमालीची अस्वस्थ होती. शिवानी वडिलांची अत्यंत लाडकी होती. तिचेही तिच्या वडिलांवर खूप प्रेम होते. वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर जगण्यात काही अर्थच उरला नसल्याचे ती वारंवार बोलून दाखवायची. शिवानीची आई आणि मामा नॅपकीनचा कारखाना चालवितात. शिवानीच्या आईने मोठ्या हिमतीने घर सांभाळले होते. त्या शिवानीलाही दिलासा द्यायच्या. शिक्षणात लक्ष देण्याची सूचना करायच्या. शिवानी पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये शिकायची. लॉकडाऊनमुळे ती नागपुरात आली होती. मात्र ती नेहमीच निराश राहायची. या अवस्थेत शुक्रवारी दुपारी २ ते ३.२५ च्या दरम्यान आई कामात गुंतल्याची संधी साधून शिवानीने गळफास लावून घेतला. हे दृश्य दिसताच तिच्या आईने हंबरडा फोडला. त्यानंतर धंतोली पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी शिवानीच्या रूमची तपासणी केली असता इंग्रजीमध्ये लिहिलेली सुसाईड नोट आढळली.
आपल्या आत्महत्येला दुसऱ्या कुणालाही जबाबदार धरू नये, असे तिने लिहून ठेवल्याचे पोलीस सांगतात. शिवानीच्या मृत्यूमुळे धंतोलीतील चितळे मार्ग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदिरा प्रशांत टेकाडे ( वय ४८) यांनी दिलेल्या सूचनेवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
तरुणाने लावला गळफास
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमाईनगरमध्ये राहणारा शुभम लालाजी यादव (वय २४) यांनी शुक्रवारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. शुभमच्या वडिलांचे गॅरेज असून तोही गॅरेजमध्ये वडिलांच्या कामात हातभार लावत होता. शुभमचे एकत्रित कुटुंब आहे. शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर ११ च्या सुमारास शुभम वरच्या माळ्यावर त्याच्या रूममध्ये गेला. काही वेळानंतर शुभमची बहीण चादर आणायला रूममध्ये गेली असता शुभम गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने आईबाबांना सांगितले. त्यांनी शुभमला खाली उतरवून इस्पितळात नेले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून कपिलनगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.