क्षुल्लक कारणावरुन मित्राचीच केली हत्या
By admin | Published: April 22, 2017 05:29 PM2017-04-22T17:29:04+5:302017-04-22T17:29:04+5:30
क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 22 - क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. किरण सदाशिव सिंधी मेश्राम (वय २२) असे मृताचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला भुजबळ लेआऊटमधील रहिवासी होता. तेथेच राहणा-या नरेश लक्ष्मण बाहेकरने (वय २६) त्याची हत्या केली आहे.
किरण आणि नरेश एकमेकांचे चांगले मित्र होते. आरोपी वाहनचालक आहे. नेहमीप्रमाणे कामावरून परतल्यानंतर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हे दोघे अन्य मित्रांसोबत दारू पीत बसले. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर नरेशने किरणला बेदम मारहाण केली. यावेळी अन्य मित्रांनी मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले. काही वेळेनंतर पुन्हा दोघांत बाचाबाची झाली. यावेळी पुन्हा आरोपी बाहेकरने किरणवर हात उगारला. किरणनेही आरोपीला एक थापड मारली. त्यानंतर आरोपी पाहून घेण्याची धमकी देऊन निघून गेला.
काही वेळेनंतर खर्रा खाऊन येऊ म्हणत किरण अन्य दोन मित्रांच्या सोबत दुचाकीवर बसून गेला. तिकडे त्रिमुर्ती नगर, गजानन मंदिराजवळच्या मैदानात घात लावून बसलेल्या आरोपी बाहेकरने किरणवर भाजी कापण्याच्या पावशीने वार करून त्याला रक्तबंबाळ केले
त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. पहाटे २ ते २.३० वाजता माहिती कळाल्यानंतर प्रतापनगर पोलीस किरणच्या घरी पोहचले. किरणचे वडील सदाशिव मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बाहेरकरला अटक केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला.