नागपुरात जीएसटी विरोधातील व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 08:57 PM2021-02-26T20:57:08+5:302021-02-26T21:00:24+5:30

Traders' strike जीएसटी कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात, इंधन दरवाढ मागे घ्यावी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारे ई-वे बिल सादर करण्याच्या मागणीसाठी देशातील आठ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदचे आवाहन केले होते.

Mix response to traders' strike against GST in Nagpur | नागपुरात जीएसटी विरोधातील व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

नागपुरात जीएसटी विरोधातील व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्दे शनिवार, रविवार दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम : जीएसटी कायद्यात शिक्षेची तरतूद

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : जीएसटी कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात, इंधन दरवाढ मागे घ्यावी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारे ई-वे बिल सादर करण्याच्या मागणीसाठी देशातील आठ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) २६ फेब्रुवारीला भारत बंदचे आवाहन केले होते. बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपुरातील काही बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या तर काही अंशत: सुरू होत्या. शनिवार व रविवारी बाजारपेठा बंद राहणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला होता.

जीएसटीच्या जाचक अटी त्रासदायक असून त्याचा विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध करावा आणि एकजुटीचा संदेश सरकारपर्यंत जाण्यासाठी व्यापाऱ्यांनी एक दिवस दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी विविध बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना केले. बंदमध्ये इतवारी किराणा ओळ, मस्कासाथ, भांडे ओळ, इतवारी सोने-चांदी ओळ, महाल, सीताबर्डी आदी बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. सक्करदरा भागातील दुकाने सुरू होती.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, देशभरातील वाहतूकदार, हॉकर्स, लघु उद्योग आणि महिला उद्योजिका बंदच्या समर्थनार्थ आंदोलनात उतरल्या. कॅटच्या बंदमध्ये देशभरातील ४० हजारांपेक्षा जास्त व्यापारी संघटनांशी जुळलेले ८ कोटींपेक्षा जास्त व्यापारी सहभागी झाले होते.

जीएसटी कायद्यातील नियमांमध्ये सरकारने केलेले संशोधन आणि ई-कॉमर्स व्यवसायात विदेशी कंपन्यांना सूट दिल्याने किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय हळूहळू संपुष्टात येणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षीपासून किरकोळ व्यवसायावर संकट आले आहे. आता कुठे व्यवसाय रुळावर येण्यास सुरुवात झाली होती. पण यंदाही कोरोनाची दुसरी लाट आल्याने व्यावसायिकांवर पुन्हा नव्याने संकट आले आहे. शुक्रवारच्या बंद आंदोलनानंतर शनिवार आणि रविवारी दुकाने बंद राहणार असल्याचा फटका व्यावसायिकांना बसणार आहे. कोरोना महामारी आणि विविध करांच्या बोझ्यामुळे किरकोळ व्यापारी संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, जीएसटी कायद्यातील जाचक तरतुदींचा एकजुटीने विरोध करण्यासाठी चेंबरने बंदमध्ये सहभाग नोंदविला. सर्व किरकोळ व्यापाऱ्यांनी चेंबरच्या आवाहनार्थ दुकाने बंद ठेवली. इतवारी शहीद चौकात व्यापाऱ्यांची सभा घेऊन त्यांना जीएसटी तरतुदींची माहिती देण्यात आली.

नागपूर सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे म्हणाले, जीएसटी नोंदणीकृत सराफांनी बंद पाळून दुकाने बंद ठेवली. जीएसटी नोंदणीकृत नसलेली दुकाने सुरू होती. जीएसटीच्या कठोर तरतुदींचा सर्वांनाच त्रास होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते.

नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, बहुतांश बाजारपेठांमधील किराणा दुकानदार दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले. शनिवार व रविवारी दुकाने बंद राहणार असल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

Web Title: Mix response to traders' strike against GST in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.