नागपुरातील उमरेड मार्गावर मिक्सर ट्रकने शिक्षिकेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:00 PM2018-07-10T23:00:50+5:302018-07-10T23:02:18+5:30
भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाने एका शिक्षिकेला चिरडले. या अपघातात शिक्षिकेचे पती जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजता उमरेड मार्गावरील श्यामबाग चौकाजवळ हा भीषण अपघात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाने एका शिक्षिकेला चिरडले. या अपघातात शिक्षिकेचे पती जबर जखमी झाले. मंगळवारी दुपारी १२.४० वाजता उमरेड मार्गावरील श्यामबाग चौकाजवळ हा भीषण अपघात घडला.
तुकडोजी पुतळ्याजवळ राहणाऱ्या आशा शत्रुघ्न रोकडे (वय ५०) या त्यांचे पती शत्रुघ्न मोतीरामजी रोकडे (वय ६१) यांच्या मोपेडवर बसून मंगळवारी दुपारी शाळेतून घराकडे जात होत्या. ट्रकचा (एमएच ४०/ एके ५८०१) चालक दिलीप सोमाजी पटले (वय ३०, रा. डोंगरी तुमसर, जि. भंडारा) याने रोकडे दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे आशा रोकडे खाली पडल्या. त्यांना आरोपी ट्रकचालक पटलेने चिरडले. वर्दळीच्या मार्गावर झालेल्या या भीषण अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. जमावाने आरोपी पटलेची धुलाई केली. माहिती कळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा पोहचला. त्यांनी जमावाच्या तावडीतून आरोपीला ताब्यात घेतले. रोकडे यांच्या तक्रारीवरून आरोपी पटलेविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.