नागपूर विद्यापीठातून एमकेसीएल निलंबित, उच्चस्तरीय चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 01:12 PM2022-08-29T13:12:04+5:302022-08-29T13:16:11+5:30
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आढावा बैठकीत निर्देश : प्रोमार्कवर सोपवली जबाबदारी
नागपूर : राज्याचे उच्च व शिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन प्रा. लि. (एमकेसीएल) या कंपनीला रविवारी तातडीने निलंबित केले. कंपनीकडून परीक्षेची जबाबदारी परत घेऊन ती प्रोमार्कला सोपवण्यात आली आहे. यासोबतच उच्चस्तरीय चौकशीचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. चौकशी समितीला आपला अहवाल आठ दिवसात सादर करायचा आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या नेतृत्वात ही समिती राहील. यात आ. अभिजित वंजारी, आ. प्रवीण दटके, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे, ॲड. मनमोहन वाजपेयी यांचा समावेश राहील.
राज्याचे उच्च व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात रविवारी विद्यापीठात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत उपरोक्त निर्देश दिले. सूत्रानुसार चौकशी समिती ही एमकेसीएलला कंत्राट देणे, परीक्षेचे कार्य व निकाल जाहीर होण्यास झालेला उशीर यासोबतच इतर तक्रारींचीही चौकशी करेल. ही चौकशी समिती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे व माजी कुलसचिव पुरण मेश्राम यांच्याकडूनही माहिती जाणून घेईल. तसेच विद्यापीठ व्यवस्थापन समिती व सिनेट सदस्यांनी लावलेल्या आरोपांचीही चौकशी केली जाईल. गेल्या गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे सदस्य प्रवीण दटके आणि काँग्रेसचे सदस्य अभिजित वंजारी यांनी नागपूर विद्यापीठातील एमकेसीएल कंपनीद्वारे परीक्षेचे निकाल जाहीर होण्यास होत असलेल्या उशिराबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात यासंदर्भात २८ ऑगस्ट रोजी बैठक आयोजित करण्यात येईल, असे सांगितले होते. तसेच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी ही बैठक पार पडली. या बैठकीत आढावा घेतल्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे पार पडलेल्या बैठकीत आ. नागो गाणार, आ. प्रवीण दटके, आ. ॲड. अभिजित वंजारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र. कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा नियंत्रण बोर्डाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
‘लोकमत’ने केला होता खुलासा
परीक्षेच्या कामाची जबाबदारी मिळाल्यापासूनच एमकेसीएलबाबत वाद सुरू आहे. कुलगुरू डॉ. चौधरी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये परीक्षा व प्रवेश संबंधीच्या कामाची जबाबदारी एमकेसीएलकडे गुपचूपपणे सोपवली होती. ‘लोकमत’ने ३ जानेवारी २०२२ रोजी याचा खुलासा केला होता. विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी यावर आवाजही उचलला होता. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. हिवाळी परीक्षांदरम्यान व त्यानंतर निकाल जाहीर करण्यास प्रचंड उशीर झाला. सूत्रानुसार सहा महिने लोटूनही अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत.