‘एमकेसीएल’च्या गोंधळाचा फटका महाविद्यालयांना; विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:41 PM2022-04-08T17:41:47+5:302022-04-08T17:59:49+5:30
कुलगुरूंनी स्वत: ‘एमकेसीएल’ची जबाबदारी घेत असल्याचा दावा केला होता. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ कामाचा फटका महाविद्यालयांना बसतो आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एकदा हाकलूनदेखील परत काम देण्यात आलेल्या ‘एमकेसीएल’च्या गोंधळाचा फटका महाविद्यालयांना बसण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महाविद्यालयांना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
नागपूर विद्यापीठाने काही वर्षांअगोदर ‘एमकेसीएल’ला बाहेरचा रस्ता दाखविला होता. त्यानंतर सर्व कारभार सुरळीत सुरू असताना कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हट्टापोटी त्याच कंपनीला विद्यापीठात परत आणण्यात आले. कुलगुरूंनी स्वत: ‘एमकेसीएल’ची जबाबदारी घेत असल्याचा दावा केला होता. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ कामाचा फटका महाविद्यालयांना बसतो आहे.
२५ एप्रिलपासून उन्हाळी परीक्षा सुरू होणार असताना अनेक महाविद्यालयांना अर्ज भरताच आले नव्हते. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्राचार्य फोरमने केली होती. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना १५ मार्चपर्यंत अर्ज भरण्यास सांगितले होते. दरम्यान, विद्यापीठाचे संकेतस्थळ सुरू न झाल्याने अर्ज जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने २५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, या अडचणी दूर न झाल्यामुळे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत अगोदर ३१ मार्च व नंतर ४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत आणखी वाढविण्यात आली आहे.
विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करीत आहे की केवळ एका कंपनीला महसूल मिळावा यासाठी काम सुरू आहे, असा सवाल संतप्त प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही.