मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 05:41 PM2022-06-06T17:41:51+5:302022-06-06T18:19:57+5:30
आमदार आशिष जयस्वाल यांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे.
नागपूर : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. आशिष जयस्वाल यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या टक्केवारीवर बोट ठेवत नाराजीचा सूर आवळला आहे. अनेक मंत्री आमदारांपासून मतदारसंघाच्या कामातून देखील पैशाची अपेक्षा ठेवतात. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच काही मंत्री निधी देतात. वेगवेगळ्या पद्धतीने तो निधी घेण्याचा प्रयत्न करतात, असा खळबळजनक आरोप पुन्हा आशिष जयस्वाल यांनी सोमवारी केला.
आ. जयस्वाल म्हणाले, काही मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत आहेत. त्यांना असे वाटत आहे की मीच सर्वेसर्वा झालो आहे. मीच या निधीचा मालक आहे. अशांची मंत्रिमंडळातूनच हकालपट्टी केली पाहिजे. आमदारांना सांभाळण्याची मंत्र्यांची जबाबदारी आहे. मी शिवसैनिक आहे. महाविकास आघाडी सोबत आहे. त्यामुळे राज्यसभा व विधान परिषदेची निवडणूक झाल्यावर मी माझी लढाई सुरू ठेवीन.
...तर सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील
निधी वाटपावरून आमदारांची नाराजी कायम आहे. निधी वाटपाचा असमतोल सहन करणार नाही. जे मंत्री आमदारांना मोजत नाही, किंमत देत नाही, जर आमदारांचे प्रश्न सुटले नाही, न्याय मिळाला नाही, तर आम्ही सहन करणार नाही. याचा उद्रेक होईल. याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा जयस्वाल यांनी दिला.