आ. आशिष जयस्वाल भडकले; निधी वाटपावरून बंडाचे सूर, मंत्र्यानाही इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 12:39 PM2022-05-20T12:39:08+5:302022-05-20T12:45:08+5:30
मंत्र्यांकडून असमान निधी वाटपात काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, अशी शंकाही आशीष जयस्वाल यांनी उपस्थित केली आहे.
नागपूर : शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे. मंत्र्यांकडून निधी वाटपात भेदभाव होत आहे. आमदारांच्या मतदारसंघात दुसऱ्यांच्या शिफारसीवर निधी दिला जात आहे, असे सांगत निधी वाटपात मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जयस्वाल म्हणाले, ही काही माझी एकट्याची तक्रार नसून बहुतांश आमदारांची तक्रार आहे. काँग्रेसच्या आमदारांनीही तक्रारींवर सही केली आहे. सर्व आमदारांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. काहींना झुकते माप व काहींवर अन्याय हे होऊ देणार नाही. सर्व आमदारांच्या भरवशावर विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या आमदारांना नियमानुसार निधी देणे आवश्यक आहे.
त्याच आमदारांच्या मतदारसंघात इतरांच्या शिफारशीवरून कामे कशी दिली जातात. आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा थेट आरोप त्यांनी केला. आमदारांच्या तक्रारीची दखल घेत असमान निधी वाटपास स्थगिती दिल्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असेही त्यांनी सांगितले.
निधी वाटपात आर्थिक व्यवहार
मंत्र्यांकडून असमान निधी वाटपात काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, अशी शंकाही आशीष जयस्वाल यांनी उपस्थित केली आहे. कुठल्याही आर्थिक व्यवहारातून निधी वितरित करण्यात आला असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशा सर्व मंत्र्यांची पोलखोल करू, असा इशाराही त्यांनी दिला. जयस्वाल यांचे हे आरोप गंभीर असून यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री आर्थिक व्यवहारातून निधी वितरित करतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.