युवा संघर्ष यात्रेत राडा, पोलिसांचा लाठीमार; सरकारच्या वतीने सभास्थळी कोणीच आले नाही

By जितेंद्र ढवळे | Published: December 13, 2023 05:49 AM2023-12-13T05:49:06+5:302023-12-13T05:52:13+5:30

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसात अर्धा तास झालेल्या झटापटीमुळे टेकडीरोडवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

MLA Rohit Pawar's Yuva Sangharsh yatra was lathi-charged by the police in Nagpur | युवा संघर्ष यात्रेत राडा, पोलिसांचा लाठीमार; सरकारच्या वतीने सभास्थळी कोणीच आले नाही

युवा संघर्ष यात्रेत राडा, पोलिसांचा लाठीमार; सरकारच्या वतीने सभास्थळी कोणीच आले नाही

जितेंद्र ढवळे

नागपूर : बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेनंतर मंगळवारी नागपुरात राडा झाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसात अर्धा तास झालेल्या झटापटीमुळे टेकडीरोडवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीतरी सभास्थळी यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले होते. मात्र, सभा संपल्यानंतरही कुणी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह निवेदन ठेवलेल्या बैलगाडीसह विधानभवनाकडे कूच केले. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यात  झटापट झाली. लाठीचार्जनंतर  कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, सलील देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पूजा पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या यात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके हे कार्यकर्त्यांसोबत सहभागी झाले होते. पोलिसांशी झालेल्या झटापटीत तेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकल येथे दाखल केले .

आमदारांचेही ऐकत नाहीत

राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षा. शिष्यवृत्तीचा मुद्दा घेऊन आम्ही निघालो आहोत. पण, या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही. एखाद्या आमदाराचे कुणी ऐकत नसेल तर सामान्य माणसाचे कोण ऐकणार? हे सरकार भित्रं आहे, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: MLA Rohit Pawar's Yuva Sangharsh yatra was lathi-charged by the police in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.