संतोषला २०० फटके मारले, पाणी मागताच नराधमांनी...; सुरेश धसांनी सभागृहात मांडलं हादरवणारं वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 20:29 IST2024-12-18T20:28:02+5:302024-12-18T20:29:59+5:30
"आरोपींनी संतोषला मारहाण करत असताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून सगळा प्रकार दाखवला होता. हा कॉल नक्की कोणाला केला होता, याचीही चौकशी व्हावी," अशी मागणी धस यांनी केली आहे.

संतोषला २०० फटके मारले, पाणी मागताच नराधमांनी...; सुरेश धसांनी सभागृहात मांडलं हादरवणारं वास्तव
Suresh Dhas On Sarpanch Murder ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात झाली. या चर्चेवेळी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातील हादरवून टाकणारे तपशील सभागृहासमोर मांडले आणि उपस्थित सर्व आमदारही स्तब्ध झाले. "संतोष देशमुख यांना सात आरोपींनी दीडशे ते दोनशे फटके मारले. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्तस्त्राव होऊन दोन लीटर रक्त साचलं होतं. वेदना झाल्यानंतर संतोषने पाणी मागितलं. मात्र आरोपींना त्याला पाणी देण्याऐवजी दुसरंच काहीतरी दिलं. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली," असं धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सरपंच हत्या प्रकरणात पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, "गावातील दलित समाजातील वॉचमनला मारल्यामुळे सरपंच संतोष देशमुख हे मध्यस्थीसाठी गेले होते. तेव्हा त्यांची सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबतच्या इतर तरुणांसोबत बाचाबाची झाली होती. यावेळी झालेल्या वादातून सरपंचाने घुलेच्या एखादी कानशिलात लगावली असेल. पण याचा राग मनात ठेवून दोन दिवसांनी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांना एका ठिकाणी नेऊन रिंगण करून मारहाण करण्यात आली. अपहरण होत असताना तिथं संतोषचा आत्येभाऊ होता. तो धावत पोलीस ठाण्यात पोहोचला. पण पोलिसांनी तीन तास साधी फिर्यादही लिहून घेतली नाही. त्यामुळे हत्या प्रकरणात पोलिसांनाही सहआरोपी केलं पाहिजे. तसंच या सगळ्या आरोपींचा आका शोधला पाहिजे," अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. तसंच या आरोपींनी संतोषला मारहाण करत असताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून सगळा प्रकार दाखवला होता. हा कॉल नक्की कोणाला केला होता, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी धस यांनी केली आहे.
"नराधमांची परिसरातील लहान मुलींवरही वक्रदृष्टी"
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींनी यापूर्वी परिसरातील लहान मुलींचीही छेड काढल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. आरोपींच्या दहशतीमुळे या प्रकरणांबाबत गुन्हा नोंद झालेला नाही. मात्र तो आपण करून घ्यावा, असं आवाहनही धस यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्या जवळचे असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावही हत्या प्रकरणात गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.