आमदार-नागरिकांचा संताप भोवला, दंगलग्रस्त भागातील ठाणेदाराकडून काढली जबाबदारी
By योगेश पांडे | Updated: April 1, 2025 22:40 IST2025-04-01T22:40:18+5:302025-04-01T22:40:51+5:30
१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता.

आमदार-नागरिकांचा संताप भोवला, दंगलग्रस्त भागातील ठाणेदाराकडून काढली जबाबदारी
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १७ मार्च रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दंगलीनंतर स्थानिकांमधील रोष ठाणेदार संजय सिंग यांना भोवला आहे. त्यांच्याकडून ठाणेदारपदाची धुरा काढण्यात आली असून, गुन्हे शाखेतील निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान देशमुख यांच्यासमोर राहणार आहे.
१७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर हंसापुरी येथील नागरिकांनी संजय सिंग यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावला होता. मध्य नागपुरातील आमदार प्रवीण दटके यांनीदेखील त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती व बदलीची मागणी केली होती. सिंग यांच्याकडे काही काळाअगोदरच तहसीलची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता त्यांच्याऐवजी आता शुभांगी देशमुख यांच्याकडे ठाणेदारपद देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी याबाबत निर्देश जारी केल. शुभांगी देशमुख या कणखर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात व तहसीलमध्ये त्यांच्यासमोर अनेक आव्हाने राहणार आहेत.
हिंसाचार पसरविणाऱ्यांना धडा शिकविणार : पोलिस आयुक्त
दरम्यान, हिंसाचार पसरविणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त बोलत होते. रामनवमीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल अव्हेन्यूवरील अग्रसेन भवन येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसील, कोतवाली आणि गणेशपेठ येथील पोलिस अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. दि. १७ मार्चचा हिंसाचार दुर्दैवी होता. पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली. आवश्यक बळाचा वापर करण्यात आला. हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्याचे काम सुरू आहे. अनेक आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जाईल आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाईल. पोलीस कोणालाही सोडणार नाहीत. आरोपी कितीही शक्तिशाली किंवा प्रभावशाली असले तरी ते गुन्हेगारच आहेत. सोशल मीडियावरील चॅट्स, फोटो, सीसीटीव्ही फुटेजच्या स्वरूपात पोलिसांना आरोपींविरुद्ध अनेक ठोस पुरावे मिळाले आहेत. त्या आधारे, फरार लोकांचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
जर भविष्यात कोणी अशा हिंसाचारात सहभागी झाला तर त्याला एक संस्मरणीय धडा शिकविला जाईल. पोलीस जनतेचे शत्रू नाहीत. फक्त गुन्हेगारांनीच त्याला घाबरावे, असे ते म्हणाले.