सरसंघचालकांच्या नावाचा वापर करत आमदारांना केले ‘टार्गेट’; गुजरातमधील कार्यक्रमाचे नाव घेत मागितला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 07:30 AM2023-05-17T07:30:00+5:302023-05-17T07:30:02+5:30
Nagpur News मंत्रीपदासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावाने पक्षाच्या आमदारांना संपर्क करणाऱ्या नीरज सिंह राठोडने आमदारांवर प्रभाव टाकण्यासाठी थेट सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचेच नाव घेऊन संवाद साधण्यास सुरुवात केली.
योगेश पांडे
नागपूर : मंत्रीपदासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नावाने पक्षाच्या आमदारांना संपर्क करणाऱ्या नीरज सिंह राठोडने गुजरातमधूनच आपली सर्व सूत्रे हलविली. त्याने आमदारांवर प्रभाव टाकण्यासाठी थेट सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचेच नाव घेऊन संवाद साधण्यास सुरुवात केली. राज्यातील चारपैकी तीन आमदारांना त्याने बडोदा येथे संघाच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केली तर ‘गूड न्यूज’ मिळेल असे सांगत मंत्रीपदाचे गाजर हळुवारपणे फेकले. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने जे.पी.नड्डा असे भासवत एका व्यक्तीशी आमदारांचे बोलणेदेखील करवून दिले. त्याच्या या ‘करणी’ आणि ‘कथनी’मुळे आमदारांना काही काळ त्याच्यावर विश्वासदेखील बसला होता. याच विश्वासातून एका आमदाराला खिशातील २.३५ लाख रुपये गमवावेदेखील लागले आहेत.
‘लोकमत’ने यासंदर्भात मध्य नागपुरचे आ.विकास कुंभारे, हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आ.नारायण कुचे यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला तिघांनीही बोलण्यास आढेवेढे घेतले. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला नेमका प्रकार सांगितला. आ.कुचे यांना नीरजने ११ मे रोजी पहिला फोन केला व त्याने सरसंघचालकांचा बडोद्यात कार्यक्रम होणार असून तेथील जेवण करण्याची व्यवस्था करण्याची जे.पी.नड्डा यांची सूचना असल्याचे सांगितले. त्याने परत त्यांना फोन केला व जे.पी.नड्डा हे त्यांच्याशी बोलतील असे सांगून एका व्यक्तीला फोन दिला. समोरील व्यक्तीचा आवाज जे.पी.नड्डा यांच्यासारखाच होता. २५ मे रोजी सकाळी नऊ वाजता भेट घेऊ व मंत्रीमंडळ विस्तारात तुमच्या नावाचा विचार होईल, असे सांगितले. कुचे यांनी नीरजवर विश्वास ठेवून त्याला २.३५ लाख रुपये ‘ऑनलाईन’ माध्यमातून पाठविले. नड्डा १७ व १८ मे रोजी पुण्यात असताना त्यांची भेट घालून दे असे म्हटल्यावर त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे कुचे यांना त्याच्यावर संशय आला. त्याने मंगळवारी त्यांना परत फोन केला व आणखी पैशांची मागणी केली. मात्र तुझ्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची भाषा वापरताच त्याने फोन ठेवून दिला.
मुटकुळे, कुंभारेंनादेखील संघाच्या नावाचाच ‘फंडा’
तोतया स्वीय सहायक नीरजने तान्हाजी मुटकुळे यांच्याशीदेखील संपर्क साधला. त्याने त्यांच्याशी बोलतानादेखील संघाचेच नाव घेण्याचा ‘फंडा’ वापरला. जे.पी.नड्डा यांच्याशी बोलणे करून देण्याच्या नावाखाली त्याने जेव्हा एका व्यक्तीला फोन दिला, तेव्हाच आ.मुटकुळे यांना संशय आला. काही दिवसांअगोदरच नड्डा यांच्या कार्यक्रमात ते होते. त्यामुळे त्यांना आवाजातील फरक लक्षात आला. त्यांनी त्याला थेट नकार दिला नाही. मात्र पैसे पाठविले नाही. तर आ.विकास कुंभारे यांना त्याने अगोदर शहरविकार मंत्रालय देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी फोन करत महसूल खाते देऊ असे सांगितले. कर्नाटकमध्ये भाजप हरणार असल्याने ‘डॅमेज कंट्रोल’साठी महाराष्ट्रातील मंत्री बदलले जातील, असे त्याने कुंभारे यांना सांगितले होते. त्याने सुरुवातीला १.६६ लाख रुपये पाठविण्यासाठी त्यांना युपीआय पेमेंटची लिंकदेखील पाठविली. संघातर्फे कार्यक्रमांत जेवणासाठी कधीही अशा प्रकारे पैसे मागितले जात नाही याची जाणीव कुंभारे यांना होती व त्यातूनच त्यांना आरोपीचा संशय आला.