मनपाचे बँक खाते गोठविले
By admin | Published: November 4, 2016 02:21 AM2016-11-04T02:21:54+5:302016-11-04T02:21:54+5:30
महापालिका आस्थापनेवरील ४५०० सफाई कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची १५ कोटींची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न केल्याने भविष्य निर्वाह निधी
भविष्य निर्वाह निधी विभागाची कारवाई : कर्मचाऱ्यांचे १५ कोटी रुपये थकीत
नागपूर : महापालिका आस्थापनेवरील ४५०० सफाई कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची १५ कोटींची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न केल्याने भविष्य निर्वाह निधी विभागाने महापालिकेचे बँक खाते गोठविले आहे. यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याने महापालिका प्रशासनापुढे गंभीर समस्या उभी ठाकली आहे.
महापालिके तील अस्थायी कर्मचाऱ्यांना २०११ सालापासून भविष्य निर्वाह निधी योजना लागू करण्यात आली आहे.तेव्हापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम विभागाकडे जमा करणे आवश्यक होती. परंतु महापालिका प्रशासनाने २०१३ पासून अस्थायी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याची भूमिका घेतली होती. २०११ पासूनचा भविष्य निर्वाह निधी भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागाने यापूर्वीही महापालिकेची बँक खाती गोठविली होती. त्यावेळी अस्थायी कर्मचाऱ्यांना २०११ पासून ही योजना लागू करण्याची ग्वाही दिली होती. महापालिकेने या आशयाचे शपथपत्र लिहून दिले होते. त्यानंतरही रक्कम भरण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधी विभागाने बुधवारी महापालिकेची बँक खाती गोठविण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरल्याशिवाय महापालिकेला बँक खात्यातून कोणत्याही स्वरुपाचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. यामुळे महापालिका प्रशासनापुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)
आर्थिक स्थितीचा फटका
वर्षभरापूर्वी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु या मोबदल्यात राज्य सरकारकडून अपेक्षित अनुदान प्राप्त होत नाही. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. याचा विकास कामांना फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही.
लवकरच तोडगा निघेल
महापालिका आस्थापनेवरील अस्थायी कर्मचाऱ्यांचा २०१३ पासून भविष्य निर्वाह निधी जमा केला जात आहे. परंतु २०११ ते २०१३ या तीन वर्षांच्या कालावधीतील १५ कोटींची रक्कम भरावी, अशी भूमिका भविष्य निर्वाह निधी विभागाने घेतली आहे. यासाठी महापालिकेच्या बँक खात्यातील व्यवहार थांबविले आहेत. यावर लवकरच तोडगा निघेल.
-मदन घाडगे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी, महापालिका