भव्यदिव्य विचारांमुळेच माझे नितीन गडकरींशी मन जुळलेले - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 10:38 AM2022-09-19T10:38:35+5:302022-09-19T11:27:10+5:30
देशातील लोक नक्की यासाठी नागपूरकडे येतील, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
नागपूर : उपराजधानीतील ‘म्युझिकल फाऊंटन’च्या ट्रायल शोमध्ये रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील सहभागी झाले. प्रचंड गर्दी असताना दोन्ही नेत्यांनी सोबत या शोचा आनंद घेतला.
मी आजपर्यंत असे काही भारतात पाहिले नाही. नितीन गडकरी खाली काहीच करत नाहीत. कारंजे असो किंवा उड्डाणपूल, नितीन गडकरी जे काही करतात ते 'वरून'च करतात. उड्डाणपूल ही वर जातो, कारंजे ही वर जातात अशा शब्दात राज ठाकरेंनी नितीन गडकरींचे कौतुक केले.
आमच्या दोघांचेही विचार भव्यदिव्य असतात. त्यामुळेच आमची मने जुळली आहेत. ते बोलतात तेव्हा वाटतं की हे कसं होणार, मात्र ते झाल्यावर हे खरोखरच होऊ शकतं हे पटतं. नागपूरला येण्याचे हे ‘म्युझिकल फाऊंटन’ हे आणखी एक कारण आहे. आता संत्रानगरीत स्वागत याऐवजी कारंजानगरीत स्वागत असे बोलता येईल. हा अनुभव अद्भुत होता. देशातील लोक नक्की यासाठी नागपूरकडे येतील, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
आता विदर्भातील विशेष लक्ष
कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचा हा प्रथमच विदर्भ दौरा आहे हे विशेष. मागील दशकभराच्या कालावधीत राज ठाकरे यांनी नागपूरला मोजक्या भेटी दिल्या. मात्र, यानंतर विदर्भावर विशेष लक्ष असेल असे ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले. राज ठाकरेदेखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सुमारास ते चंद्रपूरकडे रवाना होतील. तेथे विभागनिहाय बैठका घेतील. त्यानंतर २०,२१ सप्टेबंर रोजी त्यांचा अमरावती दौरा करणार असून तेथील संघटनेचा आढावा घेतील.
रविभवनात अनेकांचा हिरमोड
राज ठाकरे यांना भेटण्यासाठी रविभवनात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. यात महिला व युवकदेखील होते. मात्र, राज ठाकरे यांना भेटण्यासाठी अनेकांना संधीच मिळाली नाही. रविभवनातील बैठक सभागृहातदेखील मोजक्याच पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.
पाच पदाधिकाऱ्यांवर विदर्भ मनसेच्या आढाव्याची जबाबदारी
आजपासून नागपूरहून माझ्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली. कोरोनानंतरचा हा माझा पहिलाच विदर्भ दौरा. दीर्घकाळाने मी विदर्भातील माझ्या कार्यकर्त्यांना भेटत आहे. रविवारी रवी भवन येथे नागपूर शहरातील ६ विधानसभा आणि नागपूर ग्रामीणमधील ६ विधानसभा अशा १२ विधानसभांमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. यावेळी मी पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना, अपेक्षा, त्यांच्या मनातील योजना समजून घेतल्या. पुढील काळात अनिल शिदोरे, प्रकाश महाजन, राजू उंबरकर, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे हे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे आणि शिबिरे घेतील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.