विदर्भात पक्ष बांधणीवर मनसेचा फोकस; देशपांडे, जाधव, उंबरकर यांनी नागपुरात घेतला आढावा
By कमलेश वानखेडे | Published: June 20, 2023 02:20 PM2023-06-20T14:20:24+5:302023-06-20T14:22:16+5:30
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसैनिक हे थेट पुढून हल्ला करायचे. आता मात्र ते मागून हल्ला करतात, अशी टीका देशपांडे यांनी केली.
नागपूर : मनसेने मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत. येत्या काळात विदर्भात पक्ष बांधणीवर लक्ष दिले जात आहे. आगामी काळातील सर्व निवडणुका मनसे लढणार असून किती जागा लढायच्या हे वेळेवर ठरवू, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मनसेच्या पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर संदीप देशपांडे, अविनाश जाधव व राजू उंबरकर यांचे मंगळवारी नागपुरात आगमन झाले. नागपूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी पक्ष बांधणीचा आढावा घेतला. बैठकीला शहर अध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे उपस्थित होते. यावेळी देशपांडे म्हणाले, विदर्भात काही लोक वर्षानुवर्षे पदावर होते. आता मात्र नवीन उत्साही टीम आल्याने जुने पदाधिकारी राजीनामा देत आहेत. यामुळे पक्षाचे कुठलेही नुकसान नाही. राज्यात महापालिका निवडणूका कधी होईल हे ब्रह्मदेवालाच माहीत, असेही त्यांनी सांगितले. आज गद्दार दिन साजरा होत आहे, तो त्या दोन पक्षाचा अंतर्गत वाद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांचे ठाणे येथे भावी पंतप्रधान होर्डिंग लागले, याची खिल्ली उडवत भविष्यात आपल्याकडे अमेरिकेचे भावी पंतप्रधान असे होर्डिंग लागेल. रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आहे, उद्या ते पण एखादे होर्डिंग लावतील, असा टोला त्यांनी लगावला.
शिवसैनिक आता मागून हल्ला करतात
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसैनिक हे थेट पुढून हल्ला करायचे. आता मात्र ते मागून हल्ला करतात, अशी टीका देशपांडे यांनी केली. आपल्यावरील हल्ल्याचा कट हा चेंबूरला निलेश पराडकर यांच्या ऑफिसमध्ये रचला गेला, असा आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख आहे. निलेश पराडकर शिवसेना (ठाकरे गट) माथाडी कामगार पदाधिकारी आहे. तो सुनील राऊत आणि संजय राऊत यांच्या जवळचा माणूस आहे. निलेश पराडकर आता फरार असून त्याला अटक होईल त्यावेळी कोणाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला हे स्पष्ट होईल. उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी हा हल्ला केला गेला असे आरोपी कबूल करतात. ही राजकीय पार्श्वभूमी नाही तर कुठली पार्श्वभूमी आहे, असा सवालही त्यांनी केला. ठाकरेंकडे कार्यकर्ते उरले नाहीत त्यामुळे गँगस्टर पकडायचे. त्यांना सुपारी द्यायच्या आणि असे धंदे करायचे, असा आरोपही त्यांनी केला.