‘मॉब लिंचिंग’ ही देशाची परंपरा नाही, मोहन भागवत यांनी टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 10:32 AM2019-10-08T10:32:17+5:302019-10-08T10:33:51+5:30
विजयादशमी मेळाव्यामध्ये संघ स्वयंसेवकरांना संबोधित करताना सरसंघाचालक मोहन भागवत यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
नागपूर - विजयादशमी मेळाव्यामध्ये संघ स्वयंसेवकरांना संबोधित करताना सरसंघाचालक मोहन भागवत यांनी देशातील मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कायदाव्यवस्थेच्या मर्यादेचे उल्लंघन करुन होणाऱ्या या घटना परस्पर संबंधांना नष्ट करत आहेत. असली प्रवृत्ती ही आपल्या देशाची परंपरा नाही व संविधानातदेखील ती बसत नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे.
मॉब लिंचिंगच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करताना सरसंघचालक म्हणाले की, ''आजकाल समाजातील एका गटाकडून दुस-या समाजाच्या व्यक्तींविरोधात सामूहिक हिंसा करण्याच्या घटना होत आहेत. तशा पाहिल्या तर या घटना एकतर्फी होत नाहीत. काही घटना जाणुनबुजून होतात, तर काहींना अवास्तव स्वरुप देण्यात येते. परंतु कायदाव्यवस्थेच्या मर्यादेचे उल्लंघन करुन होणाऱ्या या घटना परस्पर संबंधांना नष्ट करत आहेत. असली प्रवृत्ती ही आपल्या देशाची परंपरा नाही व संविधानातदेखील ती बसत नाही. कितीही मतभेद असले तरी कायदा व संविधानाच्या मर्यादेच्या आतच राहिले पाहिजे. अशा प्रवृत्तींचे संघाने कधीही समर्थन केलेले नाही व याविरोधात आम्ही उभे आहोत.''
''एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षडयंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.
''सामाजिक भेदभावावरदेखील भाष्य केले. समाजात एकात्मता, समता व समरसतेची स्थिती जशी हवी होती, तशी अद्याप नाही. याचा लाभ देशविरोधी तत्व घेतात. समाजात भेदभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत,'' असेदेखील डॉ.भागवत यांनी सांगितले.
संघ मुस्लिम, ख्रिश्चन विरोधी नाही
ज्यांच्यापर्यंत संघ पोहोचलेला नाहीत, त्यांच्या मनात विविध लोक व माध्यमांतून भिती उत्पन्न करण्याचे काम होते. आपले दुष्कर्म लपविण्यासाठी आता तर इम्रान खानदेखील संघविरोधात बोलतो. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो याचा अर्थ संघ मुस्लिम व ख्रिश्चनविरोधी आहे असा होत नाही. संघाविरोधात विकृत आरोप करुन बदनाम करण्याचा प्रयत्न होतो. संघाचे हिंदुत्व हे हिंदूंपुरते मर्यादित नाही. तर भारतीय पूर्वजांचे वंशज असलेले व सर्व विविधतांचा स्वीकार करुन एकोप्याने राहणारे सर्वच भारतीय हिंदू आहेत, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.
दरम्यान, कलम 370 हटवण्यासह गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक केले. मोदी सरकारमध्ये साहसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. कलम ३७० हटवून सरकारने आपली कटिबद्धता दाखवून दिली आहे, अशी शाबासकीही भागवत यांनी दिली. तसेच इस्त्रोच्या चांद्रयान मोहिमेचेही सरसंघचालकांनी कौतुक केले. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसली तरी तिने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले, असे सरसंघचालक म्हणाले.