अल्पवयीन मुलं-मुली मोबाइलच्या आहारी! पालकांसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 05:11 PM2021-10-01T17:11:21+5:302021-10-01T17:34:30+5:30
मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन वाढले आहे. सुरुवातीला मुलगा काय शिकतोय, हे पाहणारे पालक दरम्यानच्या काळात कंटाळून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मुले विविध मनोरंजनाच्या मोहात अकडले आहेत.
नागपूर : एकीकडे स्मार्टफोनमुळे नातेसंबंध बिघडत चालले आहेत, तर दुसरीकडे अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात मोबाइल आल्याने त्याचे दुष्परिणाम अधिक दिसून येत आहेत. छोट्या-छोट्या कारणावरून घर सोडून जाणे? नको त्या वयात नको ते पाहणे? आमिषाला बळी पडणे? अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकूणच बघता-बघता हसत्या खेळत्या घरावर दु:खांचा डोंगर कोसळत आहे.
कोविड आपत्तीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षापासून ऑनलाइन एज्युकेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेज मोबाइल, टॅब व लॅपटॉपवर सुरू आहेत. याचा परिणाम आता दिसून येत आहे. मुलांमध्ये ‘मोबाइल ॲडिक्शन’चे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्रामीणमध्ये शाळा सुरू झाल्या असताना व शहरात ४ ऑक्टोबरपासून ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार होणार असले तरी अनेकांच्या हातून मोबाइल सुटलेला नसल्याचे वास्तव आहे.
मोबाइलचे दुष्परिणाम
लहान मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन वाढले आहे. सुरुवातीला मुलगा काय शिकतोय, हे पाहणारे पालक दरम्यानच्या काळात कंटाळून त्याकडे दुर्लक्ष केल्याने मुले विविध मनोरंजनाच्या मोहात अकडले आहेत. मोबाइल गेम्स, यू-ट्यूब, चॅटिंग व चित्रपट पाहण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या निर्बंध शिथिल असले तरी कोणी बाहेर खेळण्यास जात नाही. शाळेच्या वेळापेक्षा जास्त वेळ मुले मोबाइल पाहत आहेत. यासाठी खोटे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाइल पाहत असल्याने उशिरा झोपणे व उशिरा उठण्याचे प्रकार घराघरात सुरू आहेत. अभ्यासाची आवड कमी झाली असून त्याचा दर्जाही घसरला आहे.
ही घ्या काळजी
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, लहान मुलांमध्ये मोबाइल ॲडिक्शनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे एकदम त्याच्या हातून मोबाइल हिसकावू नका. मोबाइल पाहण्याचा वेळ हळूहळू कमी करा. मोबाइलमधून चित्रकला, हस्तकला किंवा एखादे वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करा. त्याचा ‘फालोअप’ घ्या.
मोबाईलच्या अॅडीक्शनचे दुष्परिणाम
८ व्या वर्गात शिकणारी शुभाला (नाव बदलेले आहे) ‘यू-ट्यूब’ पाहण्याचे वेड लागले. ऑनलाइन वर्ग सुरू असतानाही ती ‘यू-ट्यूब’ पाहत होती. तिचे इतरांशी बोलणे कमी झाले होते. आपल्यातच गुंतून राहत होती. पालकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यातून भांडण झाले. ती घर सोडून जाण्याच्या तयारीत होती; परंतु पालकांनी त्वरित मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेतला. त्यांच्या समुपदेशनामुळे ती बरी झाली.
असेच आणखी एक उदाहरण आहे सिद्धूचे, ७ व्या वर्गात असलेल्या सिद्धूला मोबाइल गेम्स खेळण्याची सवय लागली. त्याला ही सवय त्याच्या मोठ्या भावामुळे लागली. सिद्धू अभ्यासाच्या नावावर गेम्स खेळत राहायचा. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत त्याचे गेम सुरू राहायचे. ऑनलाइन गेममुळे तो आमिषाला बळी पडला. आत्महत्येचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. हा प्रकार पालकांचा लक्षात येताच त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली.
शाळा सुरू झाल्याने मोबाइलचे व्यसन सुटेल
मुलांना एखाद्या गोष्टीचे ॲडिक्शन झाले तरी योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याने ते त्यातून बाहेरही लवकर पडतात. आपल्याकडे पुढील आठवड्यात शाळा सुरू होत आहेत. यामुळे मुले पुन्हा मित्रांमध्ये मिसळतील, खेळतील, अभ्यासाला लागतील. यात त्यांना पालकांच्या मदतीची गरज असणार आहे. मुलांशी संवाद वाढविणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख मनोविकृतीशास्त्र विभाग, मेयो