मोबाईल गेमच्या वेडापायी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:19 AM2018-11-14T00:19:40+5:302018-11-14T00:23:30+5:30
क्रिश, सातवीत शिकणारा अवघ्या १४ वर्षाचा मुलगा. तसा तो निरागस, पण मोबाईल गेमच्या वेडाने त्याचा घात केला. या वेडाने शाळेकडेही दुर्लक्ष केलेल्या क्रिशला आईने रागावले आणि तेच त्याच्या संतापाचे कारण ठरले. सोमवारी आई आणि बहीण बाहेर गेल्यानंतर थेट टोकाचे पाऊल उचलत त्याने गळफास लावून जगाचा निरोप घेतला. क्रिशचे हे पाऊल त्याच्या आई व बहिणीसाठी आयुष्यभर वेदना देणारे ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिश, सातवीत शिकणारा अवघ्या १४ वर्षाचा मुलगा. तसा तो निरागस, पण मोबाईल गेमच्या वेडाने त्याचा घात केला. या वेडाने शाळेकडेही दुर्लक्ष केलेल्या क्रिशला आईने रागावले आणि तेच त्याच्या संतापाचे कारण ठरले. सोमवारी आई आणि बहीण बाहेर गेल्यानंतर थेट टोकाचे पाऊल उचलत त्याने गळफास लावून जगाचा निरोप घेतला. क्रिशचे हे पाऊल त्याच्या आई व बहिणीसाठी आयुष्यभर वेदना देणारे ठरले.
लहान लहान शाळकरी मुलांमध्येही मोबाईल व त्यातील गेम्सचे प्रचंड क्रेझ वाढले आहे. सुरुवातीला कुतूहल म्हणून पाहणाऱ्या पालकांना पुढे या मुलांवर नियंत्रण ठेवणेही कठीण जाते. पुढे हेच मोबाईल गेमचे वेड मुलांसाठी जीवघेणे ठरते. क्रिशची आत्महत्या असाच एक धडा देणारी धक्कादायक घटना ठरली आहे. क्रिश सुनील लुनावत असे दुर्दैवी मुलाचे नाव. सातवीत शिकणारा क्रिश अवघ्या १४ वर्षाचा. काही कारणास्तव चार वर्षापूर्वी पतीपासून वेगळी झालेल्या आईसोबत क्रिश आणि त्याची बहीण महालच्या मुन्शी गल्ली परिसरात राहत होते. आई सीताबर्डी येथे खासगी नोकरी करीत असून, बहीण आयशा लॉचे शिक्षण घेण्यासोबत एका कंपनीत नोकरीही करीत होती.
मिळालेल्या माहितीनुसार क्रिशला मोबाईल गेमचे प्रचंड वेड होते. या वेडापायी त्याचे शाळेकडेही दुर्लक्ष झाले होते. गेल्या महिना-दीड महिन्यापासून काहीतरी बहाणा करून तो शाळेला टाळत होता आणि घरीच मोबाईल गेम व टीव्ही बघत राहायचा. आसपास असलेल्या कुणाशीच तो बोलतही नसल्याचे सांगण्यात येत आहे. आई व बहीण अनेकदा त्याला शाळेसाठी रागवायचे. मात्र सोमवारचा दिवस त्याच्या जीवनाचा अखेरचा दिवस ठरला. सकाळी आयशा तिच्या जॉबसाठी गेली. आईला मुंबईला जायचे होते. क्रिश शाळेत जात नसल्याने आई त्याच्यावर रागावली. त्याच्याकडून मोबाईलही हिसकावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आई व बहीण बाहेर गेल्यावर एकटा असलेल्या क्रिशने टोकाचे पाऊल उचलले व गळफास लावला. सायंकाळी बहीण घरी आल्यानंतर क्रिशला आवाज दिला. मात्र आतून कुठलाही प्रतिसाद तिला मिळाला नाही म्हणून तिने खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिले. आतमध्ये भावाचा मृतदेह लटकताना पाहून तिने हंबरडा फोडला. तिचा हंबरडा ऐकून शेजारी गोळा झाले व दरवाजा तोडून आत प्रवेश केला. क्रिशने चादरीला गळफास आत्महत्या केली होती.
सूचना मिळताच कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविला. ही माहिती मिळताच मंगळवारी आई मुंबईहून परतल्या. मुलाचा मृतदेह पाहून त्या नि:स्तब्ध झाल्या होत्या.
क्रिशच्या आत्महत्येची माहिती पसरताच परिसरात अस्वस्थता पसरली आहे. घरमालक, शेजारी व आसपासचे नागरिकही स्तब्ध झाले आहेत. क्रिश सहा महिन्यापासून घरीच राहत होता. मात्र तो कुणाशी फार बोलत नव्हता. समवयस्क वयाच्या मुलांसोबतही खेळत नव्हता. त्याच्या वागण्याचे सर्वाना आश्चर्य वाटत होते मात्र त्याच्या मानसिक अवस्थेची कुणालाही कल्पना नव्हती. आई व बहीणही त्याच्या वागण्यामुळे चिंतित होत्या. मात्र कौटुंबिक स्थितीमुळे ते त्याच्यावर अधिक दबाव आणू इच्छित नव्हते. अखेर त्याने या जगाचा निरोप घेतला.