मोबाईल, खेळ, कुटुंबासोबत विरंगुळा आणि घरकाम बस्स..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:55 AM2020-04-03T10:55:38+5:302020-04-03T10:57:20+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनचा काळ. सगळंच बदललंय. सुरक्षेच्या दृष्टीने लोकांना घरीच राहावे लागत आहे. तेही थोडेथोडके नाही तर २१ दिवस. पहिला आठवडा लोटला. अनेकांच्या चेहऱ्यावर कंटाळ्याचे भाव निर्माण झाले आहेत. पण काही टवाळ सोडले तर बहुतेकांनी हा संपूर्ण आठवडा अतिशय संयमाने घरी काढला. यात मोबाईल हे सर्वात महत्त्वाचे साधन ठरले आहे. याशिवाय कुणी कुटुंबासोबत लुडो, सापशिडीचा खेळ, अष्टाचौवा अशा खेळात रमले आहेत तर कुणी गाण्यांच्या भेंड्या खेळत आहेत. अनेकांना या दिवसात पुस्तकांची गोडी लागली आहे तर अनेकांसाठी टीव्ही जवळचा झाला आहे. अनेकांच्या कुटुंबात जुन्या आठवणींतून चर्चांना रंग चढत आहे. काहीजण इंटरनेटवरून खाद्यपदार्थांची रेसिपी बघून तो पदार्थ तयार करीत सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. या काळात किराणा, भाजी आणायची मुभा असल्याने तेवढीच एक फेरफटका मारण्याची संधी लोकांना मिळते आहे. बंदिस्त घरात राहण्याची वेळ आली असली तरी ही सर्व परिस्थिती सर्वांना आयुष्यभर लक्षात राहणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. याबाबत लोकांशी संपर्क करून दिनचर्या विचारली असता प्रत्येक कुटुंबाच्या अनेक किस्से, कहाण्या समोर येत आहेत.
पुस्तक, मोबाईल आणि झोप
गांधीबाग निवासी मोनाली भोईटे यांनी लॉकडाऊनमध्ये चाललेल्या दिनचर्येविषयी सांगितले. आधी सकाळपासून आॅफिसला जायची घाई असायची. आता सर्वच थांबल्यासारख वाटते. वेळ असल्याने आईच्या कामात मदत करते. जेवणानंतर दुपारी थोडीशी झोप तर होतेच. यापूर्वी कधी अशी निवांत झोप मिळाली नव्हती. लॉकडाऊन लागणार याचा अंदाज आला होता त्यामुळे अनेक पुस्तकांची जुळवाजुळव केली होती. अनेक वर्षापासून पुस्तक वाचण्याची संधी मिळाली नव्हती. आता पुस्तके वाचण्यात वेळ जात आहे. शिवाय आईबाबांशी गप्पाही होत आहेत. सायंकाळी मोबाईलवर मित्रांशी गप्पा होतात. घरच्या फुलझाडांना पाणी देण्याचे काम होते. त्यानंतर पुन्हा घरची स्वयंपाकाची कामे आणि जेवणानंतर थोडा मोबाईलवर वेळ घालविला की झोप जवळ येते.
दिवसभर खेळ अन् बाबांचे नाटकांचे किस्से
श्रीकृष्णनगर येथील रागिणी वेणी म्हणाल्या, यापूर्वी इतका निवांत वेळ कधी मिळाला नव्हता. ना मुलांना आणि आम्हालाही नाही. सध्यातरी आॅफिसचे टेन्शन नाही. माझा मुलगा आणि आसपासच्या मुलांसोबत लुडो, सापसिडी तर कधी कॅरमचा खेळ चालतो. कधी तर गाण्याच्या भेंड्या रंगात येतात आणि आम्हीही त्यांच्यात सामील होतो. बाबा नाट्य कलावंत होते. त्यामुळे त्यांच्याकडे विविध नाटकांतले खूप सारे किस्से आहेत. त्यांचे किस्से ऐकण्यात बराच वेळ निघून जातो. मुलांचा चिवचिवाट चाललेला असतो. थोडे कंटाळवाणे वाटते पण हे दिवस निघून जातील. पुन्हा असा वेळ कधी मिळणार नाही. मात्र हा काळ खरोखरच आयुष्यभर स्मरणात राहणार आहे.