मोबाईलमुळे ‘लॉकडाऊन’ सुलभ, पण ‘मेमरी लॉस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:38+5:302021-07-07T04:10:38+5:30
- दहा वर्षांपूर्वीच्या काळाशी करावी तुलना : स्वत:चा वगळता कुणाचाच नंबर नाही लक्षात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रत्येक ...
- दहा वर्षांपूर्वीच्या काळाशी करावी तुलना : स्वत:चा वगळता कुणाचाच नंबर नाही लक्षात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असल्या तरी तंत्रज्ञानात सातत्याने होत असलेले आविष्कार मानवी जीवनाला अधिक सुसह्य करत आहेत. कोरोना संक्रमण आणि त्यायोगे बघावे लागलेले लॉकडाऊन आणि त्यात वावरणाऱ्या मानवी जमातीच्या एकूणच वागणुकीवरून हे अधिकच स्पष्ट होते. समजा, दहा वर्षांपूर्वी किंवा वीस वर्षांपूर्वी ही महामारी आली असती तर माणूस अशा कठीण प्रसंगात सहज वावरू शकला असता का? हा चिंतन करण्यास भाग पाडणारा प्रश्न आहे. मोबाईल तेव्हाही होते. मात्र, तेव्हा केवळ संपर्काचे माध्यम म्हणूनच ते साधन होते. वर्तमानात मोबाईल हे संपर्कापेक्षा तुमच्या व्यवहाराचे प्रमुख माध्यम झाले आहे आणि म्हणूनच मोबाईलमुळे ‘लॉकडाऊन’ सुलभ झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ही वास्तविकताही आहे. पण, त्याचसोबत मोबाईलवर डिपेन्डन्सी अधिक झाल्याने स्मरणशक्ती कमजोर होत असल्याचेही सिद्ध होत आहे.
लॉकडाऊनमध्ये माणूस घरी कोंडला गेला, तो एकाकी पडला, संपर्क कमी झाला... या सर्व भाकडकथा ठरत आहेत. उलट, त्याच्या हातात मोबाईल - स्मार्टफोन्स असल्याने या काळात त्याने अनेक गोष्टी साधल्या आहेत, हे अनेक सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. देशात साध्या मोबाईलसोबत स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोणताही मोबाईल वापरणारे शंभर टक्के असतील तर स्मार्टफोन वापरणाऱ्यांची टक्केवारी ९० टक्के इतकी आहे. लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या ऑनलाईन ऑफिस, शिक्षण, मिटिंग, चर्चासत्र यांमुळे तर प्रत्येकाच्या घरात स्मार्टफोनचा शिरकाव झालेलाच आहे. संपर्क आणि ऑनलाईन उपक्रमांसोबतच चित्रपट, वेबसिरीज, अन्य माहिती आणि जगासोबत स्वत:ला जोडून ठेवण्याचा अट्टाहास वाढीस लागला आहे. जसजसा हा अट्टाहास वाढत आहे, तसतसा मेंदूवरचा ताबाही शिथिल होत आहे. दहा वर्षांपूर्वीही मोबाईल होता. तेव्हा नातेवाईक, मित्र-मैत्रीण, महत्त्वाचे संपर्क क्रमांक मुखपाठ असत. आता मात्र, माहितीचा प्रहार आणि संपर्काचा साठा इतका वाढला आहे, की स्वत:चेही दोन - चार नंबर असतील तर एक वगळता बाकींचे विस्मरण झाल्याचे दिसून येते.
---------------
पॉईंटर्स
- भारताची लोखसंख्या १५० कोटी.
- स्मार्टफोन वापरकर्ते १२० कोटी.
- प्रत्येकाकडे सरासरी एक हजार संपर्क क्रमांक.
- नोटाबंदी, लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहारात प्रचंड वाढ.
- घरबसल्या बँक, भाजी, किराणा, कपडे, जेवण एका हाकेवर.
- व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, कू आदी प्लॅटफॉर्मवरील ट्राफीक वाढली.
- ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसिरीजने मनोरंजनही साधले.
--------------
मानवी मेमरी स्ट्राँग, पण...!
- मानवी मेमरी प्रचंड स्ट्राँग आहे. मात्र, एकाच वेळी अनेक गोष्टी पटकन स्मरण होणे किंवा ते लक्षात ठेवणे कठीण जाते. मोबाईल विशेषत: स्मार्टफोन्समुळे माहितीचा मारा मेंदूवर प्रचंड होत आहे आणि त्यासोबतच उत्सुकताही तेवढ्याच वेगाने वाढत आहे. आजकाल अनेकांच्या मोबाईलमध्ये हजारावर संपर्क क्रमांक आहेत. माझ्या एकट्याच्या मोबाईलमध्ये साडेनऊ हजार संपर्क क्रमांक आहेत. संपर्काची एवढी मोठी यादी गुगल, क्लाऊड यांसारख्या प्लॅटफाॅर्मवर स्टोरेज होत असल्याने ते गहाळ होण्याची भीतीही राहिली नाही. त्यामुळे, स्मरणशक्तीवर ताणही राहिला नाही. म्हणून पूर्वीप्रमाणे मोबाईल नंबर स्मरणात राहात नाहीत. मात्र, याच स्मार्टफोनमुळे लॉकडाऊनमध्ये माणूस घरात राहू शकला, अन्यथा तो डिप्रेशनमध्ये गेला असता, हेही विसरता येत नाही.
- डॉ. अविनाश जोशी, वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ
--------------
* मोबाईलचा वापर गरजेपुरता
मी ७५ वर्षांचा आहे. या वयात मोबाईल गरजेपुरता असतो. दहा वर्षांपूर्वीचे अनेकांचे क्रमांक आजही लक्षात आहेत. मात्र, आता नवे क्रमांक लक्षात नाहीत. नंबर काढण्यासाठीही नातवंडांची मदत घ्यावी लागते.
- डॉ. हरिभाऊ मस्के, आयुर्वेदतज्ज्ञ (आजोबा)
* जुने नंबर आता कोणाचेच राहिले नाहीत
दहा-पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा हातात मोबाईल प्रथमच आला तेव्हा त्याचे कौतुक होते. नंबरही मुखपाठ होते. मात्र, ते नंबर सगळ्यांचे बदलले आणि नवे संपर्क प्रचंड वाढले. त्यामुळे, ते लक्षात राहात नाहीत.
- भुपेश मस्के (मुलगा)
* घरच्यांचे नंबर पाठ आहेत
घरच्यांचे नंबर पाठ आहेत. मात्र, इतरांशी संपर्कच नसल्याने त्याची गरज नाही. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने स्मार्टफोन वापरते आणि इतर वेळी एज्युकेशनल, डिस्कवरीसारख्या गोष्टी सर्च करते.
- वल्लरी मस्के (नात)
...................