मोबाईल वापरण्यास मनाई, १६ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
By योगेश पांडे | Published: December 10, 2023 11:12 PM2023-12-10T23:12:31+5:302023-12-10T23:12:55+5:30
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मोबाईल वापरण्यास वडिलांनी मनाई केल्यामुळे संतापलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने घरी गळफास घेत आत्महत्या केली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
अंशू शांताराम उईके (१६, मांगली गाव, हिंगणा) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. अंशूचे वडील कामगार आहेत. ती दहावीची विद्यार्थिनी होती. अंशू आणि तिची लहान बहीण एकच मोबाईल वापरायचे. अंशू इंस्टाग्रामवर रील बनवायची व तिने दोन-तीन रील्स बनवून अपलोडही केले. तिला रील्स पाहण्याची आवडदेखील होती. तिच्या वडिलांनी मोबाईल कमी वापरण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही अंशू मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने तिच्या वडिलांनी मोबाईल काढून घेतला व पत्नीला दिला. यावरून अंशू संतापली.रविवारी सकाळी १० वाजता तिची बहीण बाहेर गेली होती व आई शेजारच्या घरी गेली होती.
अंशूने घरच्या स्वयंपाकघरातील सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावला. ती त्या अवस्थेत दिसल्यावर कुटुंबीय हादरले. तिला खाली उतरवून उपचारासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या वडिलांच्या सूचनेवरून हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.