जागतिक ऑटिझम दिन; मोबाईल देतोय ‘आॅटिझम’ला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 09:46 AM2018-04-02T09:46:39+5:302018-04-02T09:50:55+5:30
कोवळ्या वयात म्हणजे दोन वर्षाच्या आतील मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ‘आॅटिझम’ (स्वमग्नता) हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. १०० बालकांमध्ये साधारण ५ टक्के हा आजार दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलच्या अतिरेकाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. पाळण्यात रडणाऱ्या पोराला शांत करण्यासाठी थेट हातात मोबाईल दिला जातो किंवा मुलांनी रडून रडून त्रास देऊ नये फक्त ती शांत बसावीत म्हणूनही मोबाईल दिला जातो. परिणामी, कोवळ्या वयात म्हणजे दोन वर्षाच्या आतील मुलांच्या हातात मोबाईल आल्याने ‘आॅटिझम’ (स्वमग्नता) हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. १०० बालकांमध्ये साधारण ५ टक्के हा आजार दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत १५ टक्के आॅटिझमचे रुग्ण आढळून येतात. याविषयी अधिक माहिती देताना आॅक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. अश्विनी हजारे म्हणाल्या, लहान मुलांमध्ये आॅटिझम हा आजार मोठ्या प्रमाणात बळावत आहे. हा एक मानसिक आजार आहे. अशा मुलांचा विकास सामान्य मुलांप्रमाणे होत नाही, काही मुले आक्रमक तर काही मुले भित्रीही असतात. आॅटिझमची लक्षणे शक्यतो पालकांच्या लक्षात येत नाहीत. वयाच्या तिसऱ्या वर्षी ही लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. तीन वर्षांनंतर मूल अचानक बोलायचे थांबते. कानाची तपासणी केली तरी त्यात दोष आढळत नाही. या काळात मूल बोलत नाही, आपल्या गरजा सांगत नाही. आंघोळ, जेवण यालाही प्रतिकार करायला लागते. दैनंदिन कार्यक्रम थोडा जरी बदलला तरी त्यांना राग येतो. काही मुले त्यातून बरीच हिंसकही होतात. प्रत्येक मुलातील लक्षणे वेगवेगळी असतात. यामुळे त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे असते. ‘आॅटिझम’वर औषधे नाही, परंतु विविध थेरपीमुळे त्यांना बरीच मदत होते.
केवळ १ टक्काच ‘आॅटिझम’मुले योग्य शाळेत
उपराजधानीत साधारण ‘आॅटिझम’ची सहा हजारावर मुले आहेत. काही सामाजिक संस्थांनी आॅटिझमग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी वेगळ्या शाळा आता उपलब्ध झाल्या आहेत. अशा शाळांमधून त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकविले जाते. पण अजूनही या शाळांमध्ये मुलाला पाठविणे पालक कमीपणाचे समजतात, परिणामी केवळ एक टक्का मुले शिक्षण घेत असल्याचे वास्तव आहे. उर्वरित हजारो विद्यार्थ्यांचे काय, योग्य शाळांअभावी त्यांची कुचंबणा होत आहे.
दोन ते पाच वर्षापर्यंत केवळ अर्ध्या तासासाठीच मोबाईलचा वापर
आॅटिझम’ची लक्षणे आढळून आलेल्या दोन वर्षाच्या आतील मुलांच्या हाती मोबाईल देणे बंद केल्यास, त्यांच्यासोबत खेळल्यास, संवाद साधल्यास त्याच्यामध्ये प्रचंड बदल दिसून आले. दोन ते पाच वर्षाच्या आतील मुलांच्या हातात मोबाईल द्यायचेच असेल तर त्यात काय पाहावे, याची माहिती द्यावी. त्याचा अर्थ सांगावा आणि अर्ध्या तासाच्यावर ते मोबाईल पाहणार नाही, याचीही काळजीही घ्यावी.
-डॉ. अश्विनी हजारे
मोबाईलमुळे समस्या वाढतच आहे
डॉ. हजारे म्हणाल्या, अयोग्य जीवनशैली, मानसिक स्थिती, वाढता ताण, उशिरा प्रसूती, प्रसूतीमध्ये गुंतागुंत यामुळे मुलांमध्ये ‘आॅटिझम’चा आजार होऊ शकतो. अलीकडच्या काळात दोन वर्षाच्या आतील मुलाच्या हातात मोबाईल दिला जात असल्याने किंवा टीव्हीसमोर त्यांना बसवून ठेवले जात असल्याने काहींमध्ये ‘आॅटिझम’ची लक्षणे दिसून आली. मोबाईलमुळे लहान मुलांमधील समस्या वाढत असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे.
हे करा...
- योग्य जीवनशैली आत्मसात करा
- मुलांच्या हाती ‘गॅझेट’ देण्याऐवजी त्याच्याशी खेळा
- त्याच्याशी संवाद वाढवा
- प्रत्येक गोष्ट समजावून सांगा
- उद्यानात घेऊन जा, त्यांच्याशी खेळा
- आई-वडिलांनी आपल्या व्यस्ततेतून किमान एक तासाचा वेळ बाळासाठी काढा