मोबाईल चोराला अडीच मिनिटात सिनेस्टाईल पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:26 PM2018-09-17T22:26:26+5:302018-09-17T22:27:10+5:30
रात्री २.२० वाजता पुणे-हटिया एक्स्प्रेस या चालत्या गाडीतून उतरणाऱ्या आरोपीवर आरपीएफ जवानांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आरोपीने रेल्वे रुळावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरपीएफ जवानांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत अडीच मिनिटात त्यास वेटिंग रुममध्ये अटक केली, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्री २.२० वाजता पुणे-हटिया एक्स्प्रेस या चालत्या गाडीतून उतरणाऱ्या आरोपीवर आरपीएफ जवानांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आरोपीने रेल्वे रुळावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरपीएफ जवानांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत अडीच मिनिटात त्यास वेटिंग रुममध्ये अटक केली, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सतीजा म्हणाले, सोमवारी रात्री २ वाजता रेल्वेगाडी क्रमांक २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभी होती. ही गाडी २.२० वाजता पुढील प्रवासासाठी निघाली. तेवढ्यात एक व्यक्ती चालत्या गाडीतून खाली उतरला. ड्युटीवरील आरपीएफ जवान संजय खंडारे, कामसिंह ठाकूर, शेख शकील यांना त्याच्या हालचालीवर शंका आली. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव राजेश हरिशंकर पांडे (३५) रा. देवास मध्य प्रदेश असे सांगितले. त्याने आपण पोलीस असल्याचे सांगितले. परंतु तो पोलीस नसल्याची शंका आरपीएफच्या जवानांना आली. त्याने ओळखपत्र दाखविण्यास मनाई केली. त्याने आपल्या जवळील बॅग खाली काढून ठेवली. मोबाईलवर बोलण्याचे नाटक करतानाच त्याने रेल्वे रुळावर उडी घेतली. मालगाडीला ओलांडून तो प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या वेटिंग रुममध्ये पोहोचला. ओळख पटू नये यासाठी त्याने अंगातील लाल रंगाचे टी-शर्ट आणि मिलिटरी रंगारी कॅप काढून फेकली. तो खिडकीतून पळून जात असतानाच आरपीएफच्या जवानांनी त्यास अटक केली. त्याच्या जवळील बॅगमधून ६१,०१५ रुपये किमतीचे ७ मोबाईल, २,३६० रुपये असलेले पाकीट, ब्लेड, मोटारसायकलची चावी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विविध गाड्यांमधून चोरले मोबाईल
ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने प्रवाशांचे सात मोबाईल विविध रेल्वेगाड्यातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी देवास मध्यप्रदेश येथे आॅटो चालवीत असल्याचे त्याने आरपीएफला सांगितले. सहायक उपनिरीक्षक बघेल यांनी कागदोपत्री कारवाई करून आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले.
आरपीएफ जवानांना पुरस्कार
आरपीएफ जवानांनी आरोपीला पकडण्यात दाखविलेल्या समयसूचकतेचे ज्योती कुमार सतीजा यांनी कौतुक केले. मोबाईलवर बोलताना आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तेवढ्यात वेगाने प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून धावत जवानांनी अडीच मिनिटात त्यास रंगेहात अटक केली. जवानांच्या या कार्यासाठी सतीजा यांनी संजय खंडारे, कामसिंह ठाकूर, शेख शकील यांना प्रमाणपत्र आणि रोख दोन हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले.