धावत्या रेल्वेत मोबाईल चोरी, ३० मिनिटांत चोरटा जेरबंद

By नरेश डोंगरे | Published: January 7, 2024 09:20 PM2024-01-07T21:20:11+5:302024-01-07T21:20:21+5:30

शिवनाथ एक्स्प्रेसमध्ये चोरी : अर्ध्या तासातच आरपीएफने आरोपीला पकडले

Mobile theft in running train | धावत्या रेल्वेत मोबाईल चोरी, ३० मिनिटांत चोरटा जेरबंद

धावत्या रेल्वेत मोबाईल चोरी, ३० मिनिटांत चोरटा जेरबंद

नरेश डोंगरे 

नागपूर :
धावत्या रेल्वेगाडीत प्रवाशांचे मोबाइल बेमालूमपणे लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला ट्रेन एस्कॉर्ट पार्टी (सुरक्षा दल)ने शिवनाथ एक्स्प्रेसमध्ये बेड्या ठोकल्या.

हा १७ वर्षे वय असलेला भामटा छावणी, दुर्ग (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. रेल्वेत प्रवास करताना तो बेमालूमपणे प्रवाशांचे मोबाइल चोरतो. १८२३९ शिवनाथ एक्स्प्रेसच्या कोच नंबर एस-८ मध्ये ५ जानेवारीला रायपूर येथील जफर अली सय्यद अब्बास अली नागपूरला येण्यासाठी सहपरिवार प्रवास करीत होते. संधी साधून आरोपीने त्यांचा स्मार्टफोन चोरला. ही बाब जफर अली यांच्या लक्षात आली. यावेळी रेल्वेगाडीत कर्तव्यावर असलेल्या दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची आरपीएफ एस्कॉर्ट पार्टी कर्तव्यावर होती. जफर यांनी माहिती देताच एस्कॉर्ट पार्टीने रेल्वे डब्यात चाैकशी सुरू केली.

डब्यात काही अंतरावर असलेल्या आरोपीचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे त्याची एस्कॉर्ट पार्टीने चाैकशी केली असता तोच चोरटा निघाला. त्याच्या ताब्यातून जफर अली यांच्या मालकीचा फोन जप्त करण्यात आला. आरोपीची प्राथमिक चाैकशी केली असता त्याने यापूर्वीही असे गुन्हे केल्याचे आणि तो सराईत चोरटा असल्याचे स्पष्ट झाले. ही घटना गोंदिया जीआरपीच्या हद्दीत घडल्याने एस्कॉर्ट पार्टीने आरोपीला गोंदिया जीआरपीच्या हवाली केले. शनिवारी आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Mobile theft in running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.