अवघ्या तीन मिनिटात मोबाईल चोराला केली अटक; नागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा जवानांची चपळाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 12:56 PM2021-08-14T12:56:12+5:302021-08-14T13:06:37+5:30
Nagpur News रेल्वे सुरक्षा दलाने एका प्रवाशाचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीच्या मदतीने तीन मिनिटात अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने एका प्रवाशाचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला सीसीटीव्हीच्या मदतीने तीन मिनिटात अटक केली आहे.
अनिल पांडुरंग मदने (५३) रा. सोलापूर हे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रिझर्व्हेशन करण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते. दरम्यान, आरोपीने त्यांच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी केला. संबंधित प्रवाशाने आरपीएफ ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.
यावेळी आरोपी संबंधित प्रवाशाच्या खिशातून मोबाईल काढत असल्याचे दिसले. दरम्यान, आरपीएफने रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भिंतीजवळ आरोपी उभा असल्याचे दिसताच त्यास अटक केली. त्याने आपले नाव सोनू चेतराम वर्मा (२७) रा. मुरार, मीरानगर, ग्वाल्हेर असे सांगितले. आरोपीची चौकशी केली असता, त्याने आरक्षण कार्यालयातून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे आणखी दोन मोबाईल आढळले. हे मोबाईलही त्याने रेल्वे प्रवासादरम्यान चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, कागदोपत्री कारवाई करून आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एल. मीना, सुरेश डुलगच, भूपेंद्र बाथरी, जनार्दन बडे यांनी पार पाडली.
...........