आता मोबाईल सांगेल जवळच्या टॉयलेटचे 'लोकेशन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 03:18 PM2022-01-02T15:18:36+5:302022-01-02T15:32:18+5:30
बाहेर असताना लघुशंका आली व वेळेवर टॉयलेट न मिळाल्यास ते खरच त्रासदायक ठरते. यावर नागपूरकर टीमने एक उपाय शोधला आहे. टॉयलेटचा पत्ता सांगणारा 'क्विक पी' हा मोबाईल अॅप त्यांनी तयार केला आहे, जो तुम्हाला खरच मदतीचा ठरू शकतो.
निशांत वानखेडे
नागपूर : कोणत्याही शहरात फिरताना अचानक आलेली लघुशंका वेळेवर टॉयलेट न मिळाल्याने सर्वात त्रासदायक ठरते. हा अनुभव बहुतेकांना आला आहे. महिलांची होणारी कुचंबणा विचार न केलेली बरी.
अशा परिस्थितीत जवळच टॉयलेट सापडले तर श्वास मोकळा झाल्यासारखा वाटतो. जीव गुदमरायला लावणाऱ्या अशा परिस्थितीत जवळच्या टॉयलेटचा पत्ता सांगणारा तुमच्या मोबाइलचा अॅप दिलासा देऊ शकतो. 'क्विक पी' असे या अॅपचे नाव असून नागपूरकर टीमने तो तयार केला आहे. हा अॅप गुगल प्ले स्टोअरवर निशु:ल्क उपलब्ध आहे.
हे अॅप तयार करणाऱ्या कंपनीचे संचालक अभियंता अजित धार्मिक यांनी यामागची मजेशीर पार्श्वभूमी सांगितली. एका चिमुकलीला झालेला त्रास व त्यातून तिला सुचलेल्या कल्पनेतून अॅप तयार करण्यात आले आहे. धार्मिक यांचा मित्र एकदा कुटुंबाला घेऊन सीताबर्डी परिसरात खरेदीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला लघुशंका आली होती. यावेळी बऱ्याच वेळा फिरुनही स्वच्छतागृह न सापडल्याने त्यांना परत घरी यावे लागले.
घरी टॉयलेटमधून बाहेर निघाल्यावर चिमुकलीने त्या मोबाइलद्वारे या समस्येवर काही उपाय करता येणार नाही का, असा प्रश्न विचारला. त्या मित्राने मुलीची ही कल्पना धार्मिक यांना सांगितली व या 'क्विक.पी' अॅपच्या निर्मितीला सुरुवात झाली. या अॅपमुळे अनेकांना मदत मिळणार हे नक्की.
कुठेही गेलात तरी अॅपचा वापर करा
या अॅपमध्ये नागपूरसह देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, पुणे, जयपूर आणि ३५ प्रमुख शहरांमधील शौचालये, स्वच्छतागृहांची माहिती स्टोअर केली आहे. त्या शहरात गेल्यानंतर मोबाइल अॅपवर शोध घेतल्यास तुमच्या लोकेशनच्या एक ते पाच किलोमीटरच्या परिघात जवळ असलेल्या टॉयलेट व स्वच्छतागृहाची माहिती तुम्हाला दिशानिर्देशासह मिळेल.